राज्यात 6-7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा; रक्तदान करण्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मागील काही दिवासंपासून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यातच आता राज्यापुढे आणखी एक संकट उभे ठाकले आहे.

Image For Representation (Photo Credits : Pixabay )

राज्यात कोरोना व्हायरसची (Coronavirus) दुसरी लाट (Second Wave) झपाट्याने पसरत आहे. मागील काही दिवासंपासून वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्याचे प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. यातच आता राज्यापुढे आणखी एक संकट उभे ठाकले आहे. राज्यात आता केवळ 6-7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठी शिल्लक आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांनी दिली आहे. मुंबईसह राज्यातील रक्तासाठ्याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

राजेंद्र शिंगणे म्हणाले की, "मी आज मुंबई आणि राज्यात इतर ठिकाणाच्या ब्लड बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याचा आढावा घेतला. सध्या राज्यात पुढील 6-7 दिवस पुरेल इतकाच उपलब्ध आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे रक्त पुरवठा कमी झाला आहे."

राज्यातील रक्तसाठी कमी असल्याने रक्तदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. नियमित रक्तदात्यांनी रक्तदानाचे शिबिर आयोजित करावे. रुग्णालये, सामाजिक संघटना तसंच राजकीय नेत्यांनीही वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन शिंगणे यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसागणित मोठी भर पडत आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. मात्र तुर्तास लॉकडाऊनची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावली असून कठोर निर्बंध लागू होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आजपासून 45 वर्षीय सर्व व्यक्तींसाठी लसीकरण सुरु झाले असून सुट्टीच्या दिवशीही लस देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.