IPL Auction 2025 Live

महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 10 लाखांहून अधिक कोविड-19 च्या चाचण्या; कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारचा Trace, Test, Treat या त्रिसुत्रीवर भर

त्यामुळे कोविड-19 संसर्गावर नियंत्रण मिळण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसंच महाराष्ट्राने आज 10 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

देशावर घोंघावत असणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) संसर्गावर नियंत्रण मिळण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. राज्यात 9 मार्च रोजी कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर हळूहळू संख्या वाढत गेली. दरम्यान लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसची साखळी तोडण्यास यश आले. तरी कोविड-19 चा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबण्यात येत आहेत. तसंच चाचण्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राने आज 10 लाख कोरोना चाचण्यांचा टप्पा पार केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. तसंच कोविड-19 संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार ट्रेस, टेस्ट, ट्रीट (Trace, Test, Treat) हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवत असल्याचेही सांगण्यात आले आहे.

ट्रेस म्हणजे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचा शोध घेणे. टेस्ट म्हणजे संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी करणे. ट्रीट म्हणजे चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या लोकांवर उपचार करणे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार या त्रिसुत्रीवर अधिक भर देत आहे. दरम्यान देशात 1 जुलै पर्यंत कोरोना व्हायरसच्या 90,56,173 चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील 2,29,588 सॅपल टेस्ट कालच्या दिवसात करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

CMO Maharashtra Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 180298 वर पोहचला असून 93154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 79075 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान 8053 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाणे, नवी मुंबई ही शहरं लॉकडाऊन करण्यात आली आहेत. तर मुंबईतही रात्री 9 ते पहाटे 5 या काळात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

दरम्यान राज्यात कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपी केली जात असून त्याचे परिणाम उत्तम आहेत. त्यामुळे आतापर्यंत 93 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसंच कोरोना बाधितांना वेळीच क्वारंटाईन केल्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही अशी दिलासादायक माहिती देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.