Maharashtra Gram Panchayat Election 2023: महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस

शहादा मध्ये काल पर्यंत लोकनियुक्त सरपंचपदासाठी १९, तर सदस्यांसाठी ७७ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Election | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

महाराष्ट्रामध्ये एकूण 2359 ग्रामपंचायतींची (Gram Panchayat Election) तर 2950 सदस्य पदांसाठी आणि 130 सरपंच पदाच्या रिक्त जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणूका 5 नोव्हेंबर दिवशी होणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटच्या दिवशी दुपारी 3 पर्यंत असलेली वेळ वाढवून संध्याकाळी 5.30 केली आहे.

ऑनलाईन यंत्रणेमध्ये नामनिर्देशनपत्रासोबत सादर करावयाचे घोषणापत्र संगणक प्रणालीद्वारे भरले जात होते, मात्र त्याची प्रिंट काढतांना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी आयोगाकडे होत्या. त्या अडचणी आता दूर करण्यात आल्या आहेत.

पालघर मध्ये मुदत संपलेल्या ५१ ग्रामपंचायतीमधील ६२८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १८ ऑक्टोबरपर्यंत ६२८ जागांकरिता १९३ इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर पोटनिवडणुकीच्या ८९ जागांसाठी १५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. वाडा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी १० सदस्यांसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही. वसई तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी तीन सदस्यांसाठी एक; तर विक्रमगडमधील दोन ग्रामपंचायतींच्या दोन सदस्यांसाठी एकही अर्ज दाखल नाही.

शहादा मध्ये काल पर्यंत लोकनियुक्त सरपंचपदासाठी १९, तर सदस्यांसाठी ७७ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

आता २३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे, तसेच २५ ऑक्टोबरला माघार व त्याच दिवशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी चिन्हासह प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 नोव्हेंबरला निवडणूक होईल आणि 6 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.