COVID 19 मुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांना बसण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या म्हणजेच फॉर्म नं. 17 भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
महाराष्ट्रात आता दहावी-बारावीच्या परीक्षा (SSC-HSC Exam) मार्च-एप्रिल महिन्यात दरवर्षी प्रमाणे घेण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. दरम्यान त्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये आता महाराष्ट्र सरकारने राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. अशा विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता दहावी), उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) शुल्क भरण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळा येऊन पुढील वाटचाल खंडीत होण्याची शक्यता आहे. यास्तव महाराष्ट्र राज्यातील अशा बाधित विद्यार्थ्यांचे व्यापक हित विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2021-22 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी तसेच इयत्ता बारावी या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या अशा नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. नक्की वाचा: दहावी, बारावी परीक्षेसाठी 17 नंबरचा फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा; वर्षा गायकवाड यांची ट्विटद्वारे माहिती .
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये होणाऱ्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांना बसण्यासाठी विद्यार्थ्यांना खाजगीरित्या म्हणजेच फॉर्म नं. 17 भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या कालावधीत ही सुविधा उपलब्ध असेल. 22 नोव्हेंबरपासून विद्यार्थी नावनोंदणी अर्ज आणि शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरु शकतील. तर 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाईन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीच्या दोन छायाप्रती व मूळ कागदपत्रे शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा कराव्या लागतील.
(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2021 09:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

