25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा लाल कंदील; COVID 19 चा धोका वाढण्याची व्यक्त केली भीती

रेड झोन मधील विमानतळं सुरु करणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक ठरेल. असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सकाळी सांगितले.

Home Minister Anil Deshmukh | (Photo Credits: Facebook Live Screenshot)

देशभरात 25 मे पासून विमानसेवा सुरु करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावाला महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) लाल कंदील दाखवला आहे. रेड झोन (Red Zone) मधील विमानतळं सुरु करणं हे आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक ठरेल. असे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी आज (24 मे) सकाळी सांगितले. स्वॅब टेस्टिंग न करता केवळ थर्मल स्क्रिनिंगच्या आधारे प्रवाशांना प्रवासाची परवानगी देणे सुरक्षित ठरणार नाही. त्याचप्रमाणे कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीत रिक्षा, बस आणि टॅक्सी सेवा सुरु करणे धोकादायक ठरु शकते, असेही गृहमंत्री म्हणाले. विमान प्रवासामुळे कोरोना बाधितांच्या संख्येत भर पडल्यास रेड झोनवरील ताण अधिक वाढेल, हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातील तीन महत्त्वाची आणि आंतरराष्ट्रीय विमानतळे मुंबई, पुणे आणि नागपूर येथे असून ही तिन्ही ठिकाणं रेड झोन मध्ये येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे अशा परिस्थितीत विमानसेवा सुरु करणे योग्य ठरणार नाही. या व्यतिरिक्त काही छोटी विमानतळे नाशिक, शिर्डी, नांदेड या ठिकाणी असून ही ठिकाणे देखील रेड झोन अंतर्गत आहेत.

लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांनी आधी पासूनच तिकीट बुक केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने विमान प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. (महाराष्ट्र सरकारकडून 25 मे पासून विमान उड्डाण सुरु करण्याच्या निर्णयाला अद्याप हिरवा कंदील नाही-रिपोर्ट्स)

Anil Deshmukh Tweet:

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47190 वर पोहचला आहे. यापैकी 13404 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 32209 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 1577 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आहे.