Maharashtra Government Formation: नव्या सरकारची आज 'सत्वपरीक्षा'; सिद्ध करावे लागणार बहुमत

असे झाले तरीही आजचा दिवस हा ठाकरे सरकारासाठी फार महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण आज या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.

Uddhav Thackeray | Photo Credits: Twitter

गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय नाटकावर अखेर पडदा टाकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. 28 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत 29 नोव्हेंबरला त्यांनी मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. असे झाले तरीही आजचा दिवस हा ठाकरे सरकारासाठी फार महत्त्वाचा दिवस असणार आहे. कारण आज या नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल.  त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवसांचे विधानसभा अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडण्यात येणार आहे. आज दुपारी 2.00 वाजता सत्ताधारी आघाडीतर्फे विश्वासदर्शक ठराव आणला जाईल.

मागील आठवड्यात याच दिवशी 23 नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेली बंडखोरी आणि त्यानंतर घाईघाईत झालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी ही घटना सर्व महाराष्ट्राला हादरुन टाकणारी होती. त्या घटनेला आज 1 आठवडा पूर्ण व्हायच्या आधीच 28 नोव्हेंबरला आधीच सरकार कोसळून महाविकासआघाडीचे नवीन सरकार आले.

Maharashtra Government Formation: बहुमत चाचणीपूर्वी महाविकास आघाडीचे नेतेमंडळी विधानसभेत भेटणार

नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. त्या आघाडीने आपल्याकडे सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा राज्यपालांकडे केला होता. राज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना व त्यांच्या सहकारी मंत्र्यांना गुरुवारी दादरच्या शिवाजी पार्कवर शपथ दिली. तसेच, 3 डिसेंबरच्या आत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी नव्या सरकारला निर्देश दिले होते.

शिवसेनेचे सुनील प्रभू, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सरकारवरील विश्वासदर्शक ठराव मांडतील. रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. सरकारच्या धोरणाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे अभिभाषण करतील. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, अशी माहिती विधानसभेचे सचिव राजेंद्र भागवत यांनी दिली.