Maharashtra Congress State President: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी जोरदार स्पर्धा, अशोक चव्हाण, राजीव सातव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांची नावे चर्चेत
प्रामुख्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार राजीव सातव, अन्न व नागरी पुरवठा मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री अशोक चव्हाण यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. आता काँग्रेस हायकमांड कोणाच्या नावाला पसंती देते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
मुंबई काँग्रेस (Mumbai Congress) अध्यक्षपदाची निवड निकतीच झाली. जेष्ठ नेते आमदार भाई जगताप यांची या पदावर निवड झाली. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद (Maharashtra Congress State President) कोणाला मिळते याबाबत संपूर्ण राजकीय वर्तुळाला उत्सुकता आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सध्या काँग्रेस पक्षाचे (Congress Party) प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, सध्या ते मंत्रीपदावर असल्याने आणि काँग्रेसचा पाया तळागाळात विस्तारण्यासाठी हायकमांड प्रदेशाध्यक्ष पदासाठी खांदेपालट करण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी महाराष्ट्र काँग्रेस (Maharashtra Congress ) प्रदेशाध्यक्ष पदासाठी वेगवेळी नावे चर्चेत येत आहेत. प्रामुख्याने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यसभा खासदार राजीव सातव (Rajiv Satav), अन्न व नागरी पुरवठा मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar आणि माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे. आता काँग्रेस हायकमांड कोणाच्या नावाला पसंती देते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
नाना पटोले
नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे आहेत. त्यामुळे सध्या अडचणीत असलेल्या महाराष्ट्र काँग्रेस पक्षाला ते काहीशी उभारी देऊ शकतात असा राजकीय विश्लेषकांचे अनुमान आहे. परंतू, सध्या ते विधानसभा अध्यक्ष आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आहे. पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पद घ्यायचे तर त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तसे घडले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होईल. आगोदरच काट्याची टक्कर असलेल्या या पदासाठी भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्याने उमेदवार रिंगणात उतरवणार. असे घडल्यास पुन्हा एकदा काँग्रेस पक्षासाठी इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदार तितक्याच मोठ्या प्रमाणावर खिंड लडवणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे पटोले यांच्यासाठी काय पणाला लावायचे हा विचार काँग्रेस श्रेष्ठींना करावा लागू शकतो. (हेही वाचा, Bhai jagtap Mumbai Congress President: भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड)
पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण यांना केंद्र आणि राज्याच्या राजकारणाचा चांगला अभ्यास आहे. ते उच्चशिक्षीत असल्यामुळे त्यांना विविध विषयांची चांगली जाण आहे.शिवाय केंद्रीय नेतृत्वाशी चांगला संवाद आणि सौहार्दाचे संबंध आहेत. या आधी ते मुख्यमंत्री राहिल्याने त्यांना प्रशासन आणि राज्याचाही त्यांना चांगला परिचय आहे. तसेच नियमांच्या कक्षेत राहून काम करण्याची सवय असल्याने धोका निर्माण होईल असा निर्णय टाळण्याकडेच त्यांचा कल अनेकदा राहिला आहे. हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाचे भाग असलेतरी, संघटनात्मक कामात मात्र चव्हाण यांना अद्याप म्हणावी तशी चमकदार कामगिरी करता आली नाही. संघटनात्मक नेतृत्वासाठी चव्हाण यांना ओळखले जात नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला त्याचाही विचार करावा लागणार आहे.
राजीव सातव
राजीव सातव यांनी केंद्र आणि काँग्रेस पक्षाच्या दिल्ली वर्तुळात बऱ्यापैकी जम बसवला आहे. त्यात राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखले जाते. सध्या ते राज्यसभा खासदार, अखिल भारतीय कांग्रेस कमेटी सचिव आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी आहेत. लोकसभा निवडणूक 2014 मध्ये काँग्रेस विरोधी लाटेमध्ये काँग्रेस पक्षाचे जे काही मोजके खासदार निवडूण आले त्यात राजीव सातव यांचा समावेश होतो. राजीव सातव यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाक्ष पदाचा चेहरा मानले जात आहे . परंतू, त्यांना राज्यात येण्यात किती उत्सुकता आहे यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
विजय वडेट्टीवार
काँग्रेस पक्षातील एक बहुजन चेहरा आणि आक्रमक नेता अशी विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. सध्या त्यांच्याकडे मदत व पूनर्वसनमंत्री पदाचा कारभार आहे. या आधी त्यांनी संघटनात्मक पातळीवरही काम केले आहे. त्यात बहुजन चेहरा म्हणून ते काँग्रेसला बऱ्यापैकी जनाधार मिळवून देऊ शकतील, असे राजकीय निरिक्षकांचे निरीक्षण आहे.
दरम्यान, विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात काँग्रेसमधीलच एक गट कार्यरत झाल्याची चर्चा आहे. या गटाने नुकतीच राजधानी दिल्ली येथे हायकमांडच्या निकटवर्तियांची भेट घेतल्याचे समजते. अनेकदा काही काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेशी विसंगत मतं व्यक्त केल्याचेही पाहायला मिळाले आहे. दरम्यान, बाळासाहे थोरात हे शांत स्वभावाचे असल्यामुळे त्यांनी नेहमीच काँग्रेस पक्ष आणि महाविकासआघाडी यांच्याबाबत संयत भूमिका मांडल्याचे पाहायला मिळते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)