IPL Auction 2025 Live

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 18 पुरूष कॅबिनेट मंत्र्यांसह; एकाही महिलेचा समावेश नाही

यामध्ये शिंदे गटाला 9 आणि भाजपा ला 9 कॅबिनेट मंत्रीपदं देण्यात आली आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही.

Maharashtra Cabinet (photo credit- IANS)

'लवकरच', 'लवकरच' म्हणता म्हणता आज (9 ऑगस्ट) 40 दिवसांनी अखेर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. जनता, विरोधक यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर सातत्याने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये होत असलेल्या दिरंगाई वरून टीका होती. पण आज ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधत 18 जणांचं मंत्रिमंडळ शपथबद्ध झालं आहे. यामध्ये शिंदे गटाला 9 आणि भाजपा ला 9 कॅबिनेट मंत्रीपदं देण्यात आली आहेत. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही.

राजभवनात पार दरबार हॉल मध्ये छोटेखानी स्वरूपात 18 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण हे सरकार पुरूष प्रधान आहे. यामध्ये सारे मंत्री हे पुरूष असल्याने पुन्हा हे सरकार मंत्रिमंडळ विस्तारानंतरही चर्चेमध्ये आले आहे. नक्की वाचा: Maharashtra Cabinet Expansion: एकनाथ शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; दादा भुसे, अब्दुल सत्तार ते राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे यांचाही समावेश .

शिंदे गटामध्ये यामिनी जाधव, लता सोनावणे या महिला आमदार होत्या. तर भाजपाकडे मंदा म्हात्रे, पंकजा मुंडे होत्या. पंकजा मुंडे यांचा 2019 मधील विधानसभा निवडणूकीत पराभव झालानंतर त्यांच्या राजकीय पुर्नवसनाचा प्रश्न अनेकदा आला होता पण अनेकदा संधी असूनही वारंवार त्यांचं टाळण्यात आले आहे. मागील विधान परिषदेमध्येही त्यांना भाजपाकडून संधी मिळाली नाही आणि आता सत्तेत सहभागी असूनही पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेमध्येही आले नाही.

दरम्यान आजचा मंत्रिमंडळ विस्तार हा पहिला टप्प्यातील आहे. न्यायालयातील सत्तासंघर्षाचा निर्णय आल्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील विस्तार होणार आहे तेव्हा तरी महिला आमदारांचा विचार होणार का? हे बघावं लागणार आहे.