Maharashtra Budget Session 2023: आमदार नसतानाही मिलिंद नार्वेकर बसले सभागृहात; जाणून घ्या नेमकं घडलं काय?
मिलिंद नार्वेकर यांना सुरक्षा रक्षकांनी कसं अडवलं नाही? असा देखील प्रश्न विचारला जात आहे.
महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. शिवसेनेच्या फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष दिल्यानंतर या अधिवेशनात ठाकरे गटाची कोंडी करण्याचा त्यांचा प्रयत्न समोर येत आहे. हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं असताना आज पहिल्याच दिवशी आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची देखील एंट्री झाली. पण पहिल्याच दिवशी मिलिंद नार्वेकर राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणादरम्यान विधिमंडळाच्या सभागृहात बसल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या.
मिलिंद नार्वेकर हे आमदार नसताना अभिभाषणाच्या वेळेस सभागृहात कसे आले यावरून चर्चा रंगू लागली आहे. मिलिंद नार्वेकर यांना सुरक्षा रक्षकांनी कसं अडवलं नाही? असा देखील प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान यावर मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नक्की वाचा: Maharashtra Budget Session 2023: भरत गोगावले यांनी बजावला 55 शिवसेना आमदारांसाठी 'व्हिप'.
मिलिंद नार्वेकर सभागृहात कसे ?
आमदार नसलेले मिलिंद नार्वेकर चुकून सभागृहात बसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी असलेली गॅलरी समजून ते चुकून सभागृहात बसले होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आणि त्यानंतर नार्वेकर सभागृहातून उठून प्रेक्षागृहात गेले.
दरम्यान मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे आणि मातोश्री चे निकटवर्तीय आहेत. त्यांचा एकनाथ शिंदेंशीही जुना जिव्हाळा आहे. शिवसेनेच्या फूटीनंतरही शिंदे आवर्जुन मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गणपतीला गेले होते. नार्वेकरांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी शिंदे पोहचले होते. त्यामुळे ठाकरेंची साथ सोडून नार्वेकरही दुसर्या बाजूच्या गटात येणार का अशा चर्चा तेव्हा रंगल्या होत्या.
संजय शिरसाट यांची मिश्किल प्रतिक्रिया
'मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सभागृहात येण्याची घाई झाली आहे. उद्धव ठाकरे त्यांना आता जवळ करत नाही त्यांच्या आमदारकीचा मार्ग शिंदे गटातून जातो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आमच्याकडे किती इनकमिंग आहे. हे लवकरच कळेल' असं म्हणत संजय शिरसाट यांनी पुन्हा ठाकरे गटाला डिवचलं आहे.