Maharashtra Budget Session 2023: भरत गोगावले यांनी बजावला 55 शिवसेना आमदारांसाठी 'व्हिप'

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील.

Shiv Sena Election Symbol | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष न्यायालयाच्या दरबारात असतानाच काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाकडे दिला आहे. त्यानंतर आजपासून सुरू होणार्‍या राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शिवसेना पक्षाने 55 आमदारांसाठी पक्षादेश काढून सार्‍यांना पूर्णवेळ हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मागील आठवड्यातील कोर्टाच्या सुनावणी मध्ये 2 आठवडे कुणीही व्हिप न बजावण्याचे आदेश असताना अशाप्रकारे शिवसेना मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप जारी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काल अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' बंगल्यावर 40 आमदारांसोबत त्यांनी एक बैठक घेतली. त्यामध्ये अर्थसंकल्पातील रणनीतींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीतच व्हिप जारी करण्याचा देखील निर्णय झाला. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार त्यांचा वेगळा गट असल्याने शिंदे गट त्यांना व्हिप जारी करू शकत नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपल्याला दोन गट असल्याचं कोणतेही पत्र मिळालं नसल्याने शिवसेना हा एकच पक्ष म्हणून सध्या मला ठाऊक असल्याचं सांगत आहेत.

दरम्यान भरत गोगावले यांनी अधिवेशनाला हजेरीचा व्हिप जारी केला असला तरीही त्याचा भंग करणार्‍या विरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नाही असेही स्पष्ट केले आहे. नक्की वाचा: Budget Session 2023: महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा .

व्हिप म्हणजे पक्षाचा आदेश असतो. हा आदेश न पाळल्यास संबंधित आमदाराचे सभागृह सदस्यत्व म्हणजेच आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी शिफारस पक्षाच्या वतीने पीठासन अधिकाऱ्याकडे केली जाऊ शकते. त्यामुळे शिंदे गटाचे 40 आणि ठाकरे गटाचे 15 आमदार असे एकूण 55 आमदार या अधिवेशनात कसे सहभाग नोंदवत आहेत याकडे पुढील अनेक घडामोडी अवलंबून आहे.

आजपासून सुरू होणारं विधिमंडळ अधिवेशनात 9 मार्च दिवशी राज्याचा अर्थसंकल्प देखील मांडला जाणार आहे. उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प मांडतील.