Maharashtra Board Exams 2022: यंदा 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जासाठी परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत मुभा; विलंब फी माफ

तर दहावीचे विद्यार्थी 14 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

Varsha Gaikwad and SSC-HSC Exam (Photo Credits: FB/File Image)

कोरोनाच्या सावटाखाली यंदा महाराष्ट्र शिक्षण मंडळ 10वी (SSC), 12वीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन घेण्यास सज्ज होत आहे. अशात विद्यार्थ्यांना या बोर्ड परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आले होते. मात्र  तांत्रिक बाबींमुळे, काही गावांमध्ये इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे परीक्षेचा अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याचं समोर आल्याने आता शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे. आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये ऑनलाईन अर्जाची विलंब फी पूर्ण माफ करत असल्याचं सांगत परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देत असल्याचेही जाहीर केले आहे.

वर्षा गायकवाड यांच्या विधिमंडळातील घोषणेप्रमाणे 12वीचे विद्यार्थी 3 मार्च 2022 आता पर्यंत ऑनलाईन अर्जकरू शकतील. तर दहावीचे विद्यार्थी 14 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. त्यांना विलंब शुल्क आकारले जाणार नाही. दरम्यान यापूर्वी दहावीचे विद्यार्थी नियमित शुल्कासह 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार तर विलंब शुल्क सह 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. तर बारावीचे विद्यार्थी केवळ आता विलंब शुल्कासह 28 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत. असा आदेश काढण्यात आला होता. हे देखील वाचा: Maharashtra Board SSC, HSC Exam Timetable: दहावी, बारावी 2022 परीक्षांचं विषयांनुसार वेळापत्रक जारी; mahahsscboard.in वरून करा डाऊनलोड.

वर्षा गायकवाड यांचं ट्वीट

कोविड संकटकाळात मागील दीड-दोन वर्ष शाळा देखील बंद असल्याने मुलांचा लिखाणाचा सराव कमी झाल्याचं सांगत लेखी परीक्षेत त्यांना 15-30 मिनिटं वाढीव वेळ दिला जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत बारावीचे १४,३१,६६७ आणि दहावीचे १५,५६,८६१ आवेदन पत्रं प्राप्त झाले आहेत. अशी माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.