Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; मान्यवरांचा समावेश नाही

या यादीत एकूण 4 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

BJP | (Photo credit: Archived, edited, representative images)

BJP Candidates Third List: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आज (3 ऑक्टोबर 2019) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 4 उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने आतापर्यंत एकूण 143 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कालच्या प्रमाणे भाजपची आजची यादीही अनेकांसाठी धक्कादायक ठरली आहे. भाजपच्या तीनही यादीत पक्षाच्या विद्यमान आमदारांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता यांसारख्या मंत्र्यांचा समावेश नाही. त्यामुळे अजूनही या नेत्यांचे भविष्य वेटिंगवरच आहे.

भाजपची तिसरी यादी - 

काशीराम पावरा - शिरपूर

मल्लिकार्जून रेड्डी - रामटेक

परिणय फुके - साकोली

रमेश ठाकूर - मालाड पश्चिम

भाजपच्या तीनही यादीमध्ये खडसेंचे नाव नसल्याने, त्यांनी पक्षाने आपल्याला तिकीट न देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचा निर्णय आपल्याला मान्य असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकनाथ खडसे गेले तीन महिने आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यावरून खडसे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगत आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी)

उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र अजूनही काही महत्वाच्या नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने भाजपसाठी पुढील काही तास महत्वाचे असणार आहेत. कदाचित येत्या काही तासांमध्ये या नेत्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध होऊ शकते. युतीमध्ये भाजपच्या वाट्याला 164 जागा आल्या आहेत. त्यापैकी 143 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत.