Maharashtra Auto-Taxi Strike: 31 जुलैपासून ऑटो-टॅक्सी चालकांचा बेमुदत संप; सर्वसामान्यांना बसणार फटका, जाणून घ्या कारण
त्यामुळे ऑटो टॅक्सीचालकांचे हाल होत आहेत. तेलाच्या दरात वाढ झाल्याने भाडेवाढीबाबत कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे,
महाराष्ट्रामध्ये 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून ऑटो-टॅक्सीने (Auto-Taxi) प्रवास करणाऱ्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राज्यातील कोकण विभागातील अडीच लाखांहून अधिक ऑटो आणि टॅक्सी चालकांनी 31 जुलैच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर (Strike) जाण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑटो आणि टॅक्सी चालकांनी आपल्या अनेक मागण्या प्रलंबित ठेवल्याने बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो.
कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर म्हणाले की, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारने लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच आम्हाला बेमुदत संपावर जाण्याचा हा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. ते पुढे म्हणाले की, ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांची प्रमुख मागणी म्हणजे भाडेवाढ ही आहे. सीएनजीचे दर वाढले आहेत, त्यामुळे रिक्षा-टॅक्सीचे दर वाढवणे आवश्यक आहे. तसेच राज्य सरकारने या भागातील ऑटोरिक्षांना अनेक परमिट दिले आहेत, ते किमान 10 ते 15 वर्षे बंद केले पाहिजेत, कारण त्याचा सध्याच्या चालकांवर विपरीत परिणाम होत आहे.
गेल्या काही महिन्यांत सीएनजीसोबतच डिझेल-पेट्रोलच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे ऑटो टॅक्सीचालकांचे हाल होत आहेत. तेलाच्या दरात वाढ झाल्याने भाडेवाढीबाबत कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळे आता या चालकांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा: राज्यात प्लास्टिक बंदी झाली आणखी कठोर; शिंदे-फडणवीस सरकारने घातली 'अशा' उत्पादनांवर बंदी)
दरम्यान, यापूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तामिळनाडूच्या धर्तीवर राज्यातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याची विनंती केली होती. शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात सामंत म्हणाले की, सरकारने असे पाऊल उचलल्यास त्याचा फायदा 8.32 लाख परवानाधारक ऑटोरिक्षा आणि 90 हजार टॅक्सी चालक व या वाहनांच्या मालकांना होईल.