Maharashtra Assembly Elections 2024: चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांची मोफत ज्युसर मिक्सर देण्याची घोषणा; आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आदेश
त्यांनी आमदार लांडे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर अपलोड केलेला लाइव्ह व्हिडिओ हायलाइट केला होता. या व्हिडीओमध्ये ते बीएमसीमार्फत महिलांना ज्युसर मिक्सर वाटण्याची घोषणा करताना दिसत आहेत.
Maharashtra Assembly Elections 2024: चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे (MLA Dilip Lande) यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करत, निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) तक्रार दाखल केली आहे. लांडे यांच्यावर यापूर्वी 12.50 कोटी रुपयांच्या प्रेशर कुकर घोटाळ्याचा आरोप आहे. आता त्यांनी जाहीर सभेत घोषणा केली होती की, ते भाऊबीजेच्या दिवशी त्यांच्या मतदारसंघातील महिलांना ज्युसर मिक्सरचे वितरण करणार आहेत. लांडे यांच्यावरील आरोपांची महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली आहे. बुधवारी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी, मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबत 24 तासांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दिलीप लांडे यांच्याविरुद्ध बुधवारी, चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनने तक्रार केली होती. त्यांनी आमदार लांडे यांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकवर अपलोड केलेला लाइव्ह व्हिडिओ हायलाइट केला होता. या व्हिडीओमध्ये ते बीएमसीमार्फत महिलांना ज्युसर मिक्सर वाटण्याची घोषणा करताना दिसत आहेत. एका जाहीर सभेत, आमदारांनी महिलांना आश्वासन दिले की, ते भाऊबीजेच्या दिवशी ज्युसर मिक्सर मोफत वितरीत करतील. (हेही वाचा: Nawab Malik Slams BJP: नवाब मलिकांचा भाजपवर हल्लाबोल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कायदेशीर मान्यता)
याआधी चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनच्या पोस्टच्या आधारे, पोस्टच्या आधारे, अधिवक्ता निखिल कांबळे ज्यांनी पोलीस आणि बीएमसीकडे तक्रार दाखल केली होती आणि आमदार लांडे आणि बीएमसी एल वॉर्ड अधिकाऱ्यांनी 12.50 कोटी रुपयांचा प्रेशर कुकर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. आता बुधवारी, त्यांनी निवडणूक आयुक्त आणि राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाला पत्र लिहून असा आरोप केला आहे की, लांडे यांच्या कृतींचा उद्देश हा चांदिवली मतदारसंघातील महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी घरगुती उपकरणे वाटप करण्याचे आश्वासन देऊन अवाजवी प्रभाव पाडण्याचा आहे. गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी या तक्रारीची दखल घेत, याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांना तातडीने कार्यवाही करून 24 तासांत अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.