Maharashtra Assembly Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेसची साडेसाती संपेना; केज मतदारसंघातील उमेदवार नमिता मुंदडा यांचा भाजपात प्रवेश

औरंगाबाद (Aurangabad) येथील केज (Kaij) मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी भाजपा (BJP) प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादीला आणखीन एक मोठा धक्का बसल्याचे समजत आहे.

Namita Mundada (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Mahrashtra Assembly Elections 2019) आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपायचं नाव घेत नाहीये. अशातच आता औरंगाबाद (Aurangabad) येथील केज (Kaij) मतदारसंघाच्या उमेदवार नमिता मुंदडा (Namita Mundada) यांनी भाजपा (BJP) प्रवेश घेतल्याने राष्ट्रवादीला आणखीन एक मोठा धक्का बसल्याचे समजत आहे. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) व खासदार प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांच्या उपस्थितीत आज नमिता यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः केज मधील उमेदवारी घोषित केल्यानांतरच अवघ्या काहीच दिवसात त्यांनी भाजपाची वाट धरली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना एक ओळीचे राजीनामा पत्र पाठवत त्यांनी आज भाजपामध्ये घरवापसी केली आहे.

माजी दिवंगत राज्यमंत्री विमल मुंदडा यांची सून नमिता मुंदडा या मागील म्हणजेच 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर केज येथून उमेदवार होत्या. त्यावेळेस भाजपाच्या संगीता ठोंबरे यांच्या विरुद्ध त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, नमिता मुंदडा यांनी आपल्या राजकीय करिअरची सुरुवात ही भाजपातूनच केली होती. आजवर त्यांनी दोन वेळेस भाजपाच्या तिकिटावर तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश घेतला होता. तसेच आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून देखील जबाबदारी स्वीकारली होती.