पुणे: विधानसभा निवडणूक प्रचारात मनसेची कोंडी; राज ठाकरे यांच्या सभेसाठी मिळेनात मैदाने
9 ऑक्टोबरला राज ठाकरे (Raj Thackrey) हे पुण्यात (Pune) एक खास सभा घेणार होते, पण या सभेसाठी आता मैदानच मिळत नसल्याने ऐन वेळी मनसेची कोंडी झाल्याचे समजत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections 2019) प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरु केली आहे. मात्र निवडणुकीला आता दोन आठवडे शिल्लक असताना पुण्यनगरी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) मात्र पुरती पंचाईत झाल्याचे समजत आहे. येत्या 9 ऑक्टोबरला माणसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) हे पुण्यात (Pune) एक खास सभा घेऊन मतदारांना संबोधित करणार होते, पण या सभेसाठी आता मैदानच मिळत नसल्याने ऐन वेळी मनसेची कोंडी झाल्याचे समजत आहे. यामुळे 9 ऑक्टोबरच्या सभेसाठी मैदानाच्या ऐवजी टिळक चौकातच (Tilak Chowk) परवानगी द्यावी अशी विनंती पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
टाइम्सच्या माहितीनुसार, रविवार 6 ऑक्टोबर रोजी असरुद्दिन ओवेसी यांची सभा झाल्यावर मनसे कडून बुधवारी राजकीय सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाने सभा घेण्याचा मार्ग निवडल्यामुळे शहरातील मैदाने अपुरी पडत आहेत. परिणामी राज यांच्या सभेसाठी मध्य वस्तीमध्ये मैदानी उपलब्ध होत नाहीयेत. यांनतर मध्यवस्तीतील शैक्षणिक संस्थांच्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी मनसे कडून मागण्यात आली होती. मात्र यापैकी काही संस्थांनी सुद्धा तुमच्या सभेसाठी जागा देता येणार नाही अशा अशा शब्दात थेट विरोध दर्शवला आहे. या सर्व प्रकरणी, मनसेचे शहराध्य्क्ष अजय शिंदे यांनी निवडणूक आयोग व पोलिसांकडे तक्रार करत 'शहरात शैक्षणिक संस्थांवर सध्या सत्ताधारी पक्ष आणि त्याच्याशी संबंधित संघटनांचे वर्चस्व आहे. त्यामुळे इतर राजकीय पक्षांना सभांसाठी मैदाने उपलब्ध केली जात नसल्याचा आरोप लगावला आहे'.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. तसेच येत्या सोमवारी म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी यापैकी उमेदवारी अर्ज मागेघेण्याची शेवटची तारीख आहे. येत्या 21 ऑक्टोबर विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार आहे तर 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील.