परळी: विधानसभेच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे चक्कर येऊन कोसळल्या (Watch Video)

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे परळी मतदारसंघात (Parali) सभा घेत असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि तशाच अवस्थितीत त्या जमिनीवर कोसळल्या.

पंकजा मुंडे (Photo Credit : Youtube)

मागील काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) प्रचाराचे वादळ अखंड राज्यभर पसरले होते. कुठे पाऊस, कुठे ऊन असे वातावरण असतानाही राजकीय नेते मंडळी धडाडीने सभा घेत होते. साहजिकच याचा परिणाम काहींच्या स्वास्थ्यावर देखील जाणवून येऊ लागला. आज निवडणूक पूर्व प्रचाराच्या शेवटच्या दिवशी असाच काहीसा प्रकार भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबतही घडला. परळी मतदारसंघात (Parali) सभा घेत असताना भाषण आटोपताच पंकजा यांना अचानक भोवळ आली आणि तशाच अवस्थितीत त्या जमिनीवर कोसळल्या. हा सारा प्रकार घडताच उपस्थित अन्य नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकच गोंधळ झाला. काहींनी तसेच पंकजा यांना रुग्णालयात दाखल केले.

प्राप्त माहितीनुसार, पंकजा मुंडे यांनी आज कन्हेरवाडी, जिंतूर, पाटोदा, वडवणी आणि परळी शहर या पाच ठिकाणी सभा घेतल्या होत्या. परळी शहरातील रानी लक्ष्मीबाई टॉवर चौकात सभेत त्यांनी 40 ते 45 मिनिटं भाषण केले पण हे भाषण झाल्यानंतर त्यांना अचानक व्यासपीठावरच चक्कर आली.

पहा व्हिडीओ

दरम्यान, या सर्व प्रकारानंतर परळी टॉवरजवळ रूग्णालयात पंकजा यांची तपासणी करण्यात आली. दुसरीकडे, आज विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, यानुसार आता कोणत्याही प्रकारचा थेट प्रचार करता येणार नाही. सोमवारी 21 तारखेला राज्यातील 288 मतदारससंघांमध्ये मतदान घेण्यात येईल तर 24 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात येतील.