Mahaparinirvan Din 2020 निमित्त जयंत पाटील यांचं पत्र लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखं अभिवादन

बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनाचं औचित्य साधत संपूर्ण देशभरातून महामानवाला अभिवादन केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्र लिहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलं आहे.

Jayant Patil (Photo Credits: ANI)

आज 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन. या दिनाचं औचित्य साधत संपूर्ण देशभरातून महामानवाला अभिवादन केलं जात आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते ट्विटच्या माध्यमातून आंबेडकरांपुढे नमस्तक झाले. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्र लिहून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र त्यांनी स्वत:च्या हातांनी लिहिलं आहे. (Mahaparinirvan Diwas 2020 निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोज आणि विचार ट्विटरवर ट्रेंड!)

हे पत्र जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले."

या पत्रात त्यांनी लिहिले की,

प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत. तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत. म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!

आपला,

जयंत पाटील

पहा ट्विट:

दरम्यान, दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी दादर येथील चैत्यभूमीवर प्रचंड जनसागर उसळतो. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात बाबासाहेबांना ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते. सरकारच्या या आवाहनाला भीम अनुयायींनी देखील प्रचंड प्रतिसाद दिला. त्याचच उल्लेख पत्रात केला आहे. तसंच उपेक्षितांच्या प्रगतीसाठी झटण्याचे आणि  समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे पालन करण्याचे वचनही त्यांनी दिले आहे.