Mahalaxmi Saras Exhibition 2024: मुंबईमध्ये 26 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन; मिळणार खरेदीची व ग्रामीण भागातील चव चाखण्याची संधी
ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री (Mahalaxmi Saras Exhibition 2024) 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.
या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट,ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. (हेही वाचा: Mumbai Special Local Train For New Year: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन वर्षाच्या स्वागतासाठी धावणार विशेष लोकल ट्रेन, पहा अतिरिक्त लोकलचे वेळापत्रक)
सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे.