Mahakumbh Fake Helicopter Ride Scam: प्रयागराजमधील कुंभमेळ्यात 'हेलिकॉप्टर राईड' देण्याच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; तयार केली बनावट वेबसाईट, 5 जणांना मुंबई पोलिसांकडून अटक

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते.

Helicopter (प्रातिनिधिक प्रतिमा -Pixaby)

सध्या प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभ मेळा (MahaKumbh Mela) सुरु आहे. हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा असून, जो गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमावर भरतो. यंदाच्या महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यावधी भक्तांनी स्नान केले आहे व 26 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या हा सोहळ्यात आणखी भक्त सामील होण्याची शक्यता आहे. महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या वाहनांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. याचाच फायदा घेत भक्तांसोबतच्या अनेक फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. आता प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना ‘हेलिकॉप्टर प्रवास’ देण्याचे आमिष दाखवून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिहारमधील चार पुरुष आणि मुंबईतील अंधेरी येथील एका महिलेचा समावेश आहे. हे लोक कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर सवारीची ऑफर देणारी बनावट वेबसाइट चालवत होते. दक्षिण मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात एका महिलेने अलीकडेच तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महिलेने सांगितले की, तिने आणि तिच्या कुटुंबाने सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यादरम्यान पवित्र स्नानासाठी उत्तर प्रदेशातील प्रयागराजला जाण्याची योजना आखली होती. हे लोक आकाशातून हा धार्मिक मेळा पाहण्यास उत्सुक होते.

तक्रारदाराने सांगितले की, तिने महाकुंभ येथे हेलिकॉप्टर राईड्ससाठी गुगलवर सर्च केले आणि त्यातील एक आउटपुट तिला एका वेबसाइटवर घेऊन गेला. जेव्हा तिने तिथे दिलेल्या नंबरवर कॉल केला तेव्हा दुसऱ्या बाजूच्या माणसाने तिला सूट देऊ केली आणि 26 जणांसाठी 60,652 जमा करण्यास सांगितले. त्याने पेमेंट सुलभ करण्यासाठी एक QR कोड देखील शेअर केला. मात्र, हे पैसे हेलिकॉप्टर सेवा कंपनीऐवजी सोनामुनी देवी नावाच्या महिलेच्या बँक खात्यात पोहोचले व त्यानंतर महिलेला संशय आला. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिने कंपनीची वेबसाइट शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ती दिसली नाही.

त्यानंतर तिने कॉल करून पैशांबद्दल विचारणा केली मात्र त्याने बोलण्यास नकार दिला. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. त्याच सुमारास, कुलाब्यातील एका रहिवाशाकडूनही पोलिसांना अशीच तक्रार मिळाली. पुढील तपासात दिसून आले की, महिलेचे पैसे बिहारमधील एका एटीएममधून काढण्यात आले होते. या माहितीच्या आधारे, कफ परेड पोलिसांनी बिहारला भेट दिली आणि बिहार शरीफ येथील अविनाश कुमार उर्फ ​​बिट्टू याला अटक केली. चौकशीमध्ये बिट्टूने पोलिसांना सांगितले की, त्याने हेलिकॉप्टर राईडची बनावट वेबसाइट तयार केली होती आणि मुख्य आरोपी मुकेश कुमारच्या सूचनेनुसार एटीएममधून पैसे काढले होते. (हेही वाचा: New India Co-operative Bank Scam: न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात सरकार ठेव विम्याची मर्यादा 5 लाख रुपयांपेक्षा जास्त वाढवण्याची शक्यता)

त्याने असेही सांगितले की, मुकेश कुमार आणि सौरभ कुमार हे लोकांना हेलिकॉप्टर राईडबद्दल फोन करत होते. त्यानंतर पोलिसांनी मुकेश आणि सौरभला नागपूर स्थानकावर अटक केली. चौकशीनंतर, पोलिसांनी अंधेरी येथील एका टेलिकॉम कंपनीत पीओएस एजंट म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला आणि बेकायदेशीरपणे सिम कार्ड मिळवल्याबद्दल आणखी एका व्यक्तीला अटक केली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now