Mahad Building Collapse: इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे, दोषींवर कारवाई करण्यात येईल - एकनाथ शिंदे
या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. इमारत दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
Mahad Building Collapse: महाडमध्ये सोमवारी रात्री इमारत 5 मजली रहिवासी इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून 18 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. इमारत दुर्घटनेत दोषी असणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे.
यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महाडमध्ये झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. अजूनही यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. या इमारतीचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. (हेही वाचा - Raigad Building Collapse Update: महाड इमारत दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू, 18 जण अडकल्याची भीती; बचावकार्य अजूनही सुरू)
इमारत दुर्घटनेत जखमी तसेच मृत व्यक्तींच्या कुटुंबाला सरकारकडून योग्य मदत दिली जाईल. याशिवाय शहरातील इतर जुन्या इमारतीसाठी क्लस्टर योजना आणली जाईल, असे आवाहनदेखील यावेळी एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, कोसळलेल्या इमारतीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे या इमारत दुर्घटनेची विशेष पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे. महाड इमारत दुर्घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्य सरकारने महाड दुर्घटनेत जखमी आणि अडकलेल्या लोकांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.