Mahabaleshwar News: सेल्फी काढताना दरीत कोसळून महिलेचा मृत्यू, महाबळेश्वर येथील घटना
Mahabaleshwar Tourist Selfie Accident: सेल्फी काढण्याच्या नादात सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने महाबळेश्वर येथे एका नवविवाहीत महिलेचा हाकनाक मृत्यू झाला आहे. अंकिता गुरव असे महिलेचे नाव असून आपल्या पतीसोबत त्या पर्यटनासाठी आल्या होत्या. त्या मुळच्या उस्मानाबाद धाराशिव येथील रहिसवासी होत्या. दरम्यान, केट्स पॉइंटवर (Kate's Point Mahabaleshwar) सेल्फी (Selfie) घेताना त्यांना सुरक्षीत अंतर ठेवण्याचे भान राहिले नाही. परिणामी तोल जाऊन त्या खोल दरीत कोसळल्या. पत्नी दरीत कोसळल्याने घाबरलेल्या पतीने स्थानिक दुकानदारांच्या मदतीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. उशीरपर्यंत महिलेचा शोध घेण्यात येत होता.
घटनेची माहिती मळताच महिलेच्या शोधासाठी ट्रेकर्स कार्यकर्त्यांना पचारण करण्यात आले. मात्र दरी तब्बल 600 फूट खोल असल्याने ठावठिकाणा लागणे कठीण होऊन बसले होते. अखेर दोन तास कसून शोध घेतल्यानंतर महिलेला वरती काढण्यात यश आले. त्या पूर्णपणे बेशुद्ध होत्या. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.
अधिक माहिती अशी की, अंकिता गुरव आपल्या पतीसोबत पुणे येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे पती रेल्वेमध्ये नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिक बाबी स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाबळेश्वर हे देश-विदेशातील अनेक नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. थंड हवेचा प्रदेश असल्याने अनेक लोक या ठिकाणी पर्टटनासाठी येतात. खास करुन महाराष्ट्रातील अनेक नवविवाहीत जोडपी ही महाबळेश्वर येथेच मधुचंद्रास येतात. महाबळेश्वर ही त्यांची खास पसंती असते. याशिवाय, अनेक शाळांच्या सहली, शासकीय कर्मचारी, खासगी अस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, ग्रामस्थ आणि नागरिक या ठिकाणी पर्यटनास येतात. अशा वेळी नागरिकांनी आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी, अशा सूचना स्थानिक नागरिक आणि पोलीस, प्रशासनाकडून देण्यात येतात.
नागरिकांनी खास करुन घाट माथ्यावर पर्यटन करत असताना अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. खास करुन अलिकडील काळात सेल्फी काढणे, व्हिडिओ बनवणे यासाठी अतिसाहसी प्रकार केले जातात. त्यासाठी अत्यंत टोकाला जाणे, निमूळत्या ठिकाणी उभे राहणे, वाऱ्याचा झोत आणि दिशा न पाहता जीव मुटीत घालून सेल्फीसाठी उभे राहणे असे प्रकार पर्यटकांकडून केले जात. परिणामी या प्रदेशात ते नवखे असल्याने त्यांना वास्तवतेची माहिती नसते. त्यातून अपघात घडण्याचे प्रकार वाढत असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.