Maha Vikas Aghadi Seat Allotment: महाविकासआघाडीची बाजी? जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? संजय राऊत यांचे महत्त्वाचे वक्तव्य
लवकरच अंतिम आकडेवारी जाहीर केली जाऊ शकते.
विधानसभा नवडणूक महाराष्ट्रात (Maharashtra Assembly Election 2024) केव्हाही जाहीर होऊ शकते. त्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. नुकतीच महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) जागावाटपाची चर्चा पूर्ण करुन अंतिम निर्णयाकडे आल्याचे समजते. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना त्याबाबत पुष्टी केली. दरम्यान, त्यांनी जागावाटप नेमके कसे झाले, त्याबाबत आकड्यांमध्ये भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, भाजप आणि महायुतीचा पराभव निश्चित झाला आहे. त्या दृष्टीने जागावाटप निश्चित झाले आहे. शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस यांच्यासह डाव्या पक्षांची सलग चौथ्या दिवशी बैठक मुंबई येथे पार पडत आहे. लवकरच अंतिम चित्र स्पष्ट होईल.
मविआचे नेते बैठकीस हजर
संजय राऊत यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, आजच्या महाविकासआघाडीच्या बैठकीला जयंत पाटील, नाना पटोले यांच्यासह डाव्या पक्षांचे नेतेही उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत आम्ही तोडीस तोड उमेदवार देऊ. ज्यामुळे भाजपचा पराभव निश्चित होत आहे. महायुतीचा प्रत्येक ठिकाणी पराभव करायचा आहे. त्यामुळे आज सलग चौथ्या दिवशीही बैठक पार पडली आहे, असे राऊत म्हणाले. (हेही वाचा, Dr Medha Kirit Somaiya v/s Sanjay Raut Defamation Case: 'न्यायव्यवस्थेचं संघीकरण झालयं'; अब्रुनुकसानीच्या दाव्यात दोषी ठरल्यानंतरही संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम; 'भाजपा' वर हल्लाबोल)
उद्धव ठाकरे पत्रकार परिषद
दरम्यान, उद्या दुपारी शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेना भवन येथे एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे समजते. ही परिषद महाविकासआघाडी आणि विधानसभा निवडणूक जागावाटप या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या बैठकीत ते जागावाटपाबाबत काही स्पष्ट भूमिका मांडणार का? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. (हेही वाचा, विधानसभा निवडणूक: अमित शाह यांचा हादरा; एकनाथ शिंदे, अजित पवार यांना धक्का; महायुती फुटण्याचे संकेत)
माहायुतीच्या जोरबैठका
महाविकासआघाडी जागवाटप जवळपास निश्चित करत आली असताना सत्ताधारी महायुतीसुद्धा जागावाटपाच्या मुद्द्यावर हातपाय मारत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे 2024 ची विधानसभा तोंडावर असताना शाह यांनी चक्क 2029 च्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले आहे. तसेच, आता आपली महायुती आहे पण, 2029 मध्ये मात्र भाजप स्वबळावर सत्तेत येईल अशी घोषणाच त्यांनी करुन टाकली आहे. त्यामुळे महायुतीतील घटकपक्षांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप कसेहोते याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, Internal politics in BJP: अमित शाह यांच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्याकडे बोट; भाजपमध्ये अंतर्गत नाराजी उफाळली)
भाजप हा महायुतीतील सर्वात मोठा घटक पक्ष आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्षही महायुतीचे घटक आहेत. त्यामुळे जागावाटप करताना भाजप स्वत:कडे किती जागा घेतो आणि मित्रपक्षांना किती सोडतो याबाबतही उत्सुकता आहे.