IPL Auction 2025 Live

Maha Vikas Aghadi Morcha: शरद पवार, उद्धव ठाकरे मविआच्या मोर्चात काय म्हणाले? घ्या जाणून

या मोर्चात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी तडाकेबंद भाषण केले.

MVA March Mumbai | (Photo Credit - Twitter/ANI)

MVA March Mumbai: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त आणि अवमानकारक वक्तव्ये केली जातात. या वक्तव्यांच्या आणि वृत्तीविरोधात महाविकासआघाडीने मुंबईमध्ये अतिविराट मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बाळासाहेब थोरात, नाना पटोले यांच्यासह संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक नेते आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहिले. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनी तडाकेबंद भाषण केले. या नेत्यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे घ्या जाणून.

महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा- शरद पवार

राज्यात विकासाची स्पर्धा हवी. मात्र, त्या महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने चक्क महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख करत या लोकांनी शाळा, महाविद्यालये काढण्यासाठी लोकांकडे भीक मागितली असे म्हटले. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतात. ही वक्तव्ये गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. राज्यपालांची वेळेतच हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचेच प्रतिक आजय्या मोर्चात दिसत असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, Rashmi Thackeray in MVA Mumbai Morcha: रश्मी ठाकरे मविआच्या महाविराट मोर्चात सहभागी, शिवसैनिकांमध्ये उत्साह)

मंत्रिमंडळात बौद्धिक दारिद्र्य असणारे नेते- उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे वैभव आहे. जगाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याबद्दल अपमानस्पद वक्तव्ये केली जातात. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीबांसाठी शाळा काढल्या. त्यांनी शाळा काढल्या म्हणून आम्ही शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेतले. ते जर नसते तर काय घडले असते याचा प्रत्यय महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. या लफंग्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अजिबात अधिकार नाही. एक मंत्री म्हणतो महापुरुषांनी भीक मागितली, दुसरा सुप्रिया सुळे यांचा अपमान करतो, तिसरा मंत्री खोके घेऊन सूरतमार्गे गुवाहाटीला गेल्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करतो. कुठे शिवाजी महाराज कुठे हे लफंगे. छत्रपतींनी महलांबद्दल, परस्त्रीबद्दल आदर कसा ठेवावा याबाबत शिकवण दिली. आज हे लोक त्यांच्याशी तुलना करत आहेत. आजवर आपल्याला ज्यांनी ज्यांनी डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्यानंतर असं दृश्य सगळ्या जगानं पहिल्यांदा पाहिलं असेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, या मोर्चात अनेक मान्यवरांची भाषणे झाली. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयांना थांबविण्यासाठी आपण एकजूट दाखवायला हवी. आपल्याला येवढ्यावरच थांबून चालणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा काम आपण केले पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी हल्ला चढवला. तर, भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन भाजपचा खरा चेहरा पुढे आला आहे, असे नाना पटोले म्हणाले.