Madhukarrao Pichad Hospitalised: मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक; नाशिक मध्ये उपचार सुरू
84 वर्षीय मधुकरराव पिचड यांना नाशिकच्या 9 प्लस रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
माजी मंत्री मधुकरराव पिचड (Madhukarrao Pichad) यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार 14 ऑक्टोबरच्या सकाळी त्यांना राहत्या घरी ब्रेनस्ट्रोक आल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान मधुकरराव पिचड हे 84 वर्षीय आहेत. त्यांना नाशिकच्या 9 प्लस रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मधुकरराव पिचड यांनी मुलगा वैभव पिचड यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली होती.
मधुकरराव पिचड यांना अर्धांगवायू चा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या त्यांचे कुटुंबिय हॉस्पिटल मध्ये दाखल आहे. 2019 मध्ये पिचड पिता पुत्रांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपा मध्ये प्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणूकीमध्ये वैभव पिचड यांचा किरण लहामटे यांच्याकडून पराभव झाला होता. त्यानंतर आता राज्यातील विधानसभेपूर्वी पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याची चर्चा होती.
मधुकर पिचड यांनी 1980 ते 2009 पर्यंत अकोले विधानसभा मतदार संघातून आमदार राहिले आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवले आहे. एनसीपी मध्ये त्यांच्यावर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पद देखील देण्यात आले होते.
आज महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी इंदापूर मध्ये हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे परत आले आहेत. तर काल फलटण मध्ये फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आले आहेत.