Loudspeaker Row in Maharashtra: केवळ परवानगी असलेले लाऊडस्पीकर प्रार्थनास्थळांवर वाजणार; नाशिक मध्ये पोलिस आयुक्तांकडून परिपत्रक जारी करत सूचना जारी
राज्याचे गृहमंत्री आज याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 3 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचं अल्टिमेटम दिल्यानंतर आता राजकीय आणि प्रशासकीय स्तरावरही त्याचे परिणाम दिसत आहेत. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलिस (Nashik Police) आयुक्तालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये भोंगे लावण्यासाठी प्रत्येक प्रार्थनास्थळांना पोलिस परवानागी आवश्यक असणार आहे तसेच ज्या डेसिबलमध्ये भोंगे लावण्यास परवनगी आहे त्याच आवाजमर्यादेमध्ये ते लावावेत असंही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 3 मे नंतर मनसे राज्यात काय भूमिका घेणार? संघर्ष चिघळणार का? याकडे सार्यांचे लक्ष आहे.
राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेल्या घोषणेनुसार, जर मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मनसैनिक तिथेच अजानच्या वेळेस दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावणार आहेत. पण नाशिक पोलिस आयुक्तांनी अजानच्या वेळेपूर्वी आणि नंतर 15 मिनिटं हनुमान चालिसा लावली जाऊ शकत नाही तसेच 100 मीटरच्या परिसरामध्ये हनुमान चालिसा लावण्यास, म्हणण्यास परवनगी नसेल असं म्हटलं आहे. तसेच 3 मे पर्यंत अनधिकृत/ परवानगी नसलेले भोंगे काढले काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: गायिका Anuradha Paudwal यांची अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर बंद करण्याची मागणी; म्हणाल्या- 'इतर देशात असे प्रकार होत नाहीत मग भारतामध्येच का?'
दरम्यान आज महाराष्ट्र गृह विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परवानगी असलेले लाऊडस्पीकरच केवळ प्रार्थनास्थळांवर असतील. राज्याचे गृहमंत्री आज याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील डीजीपींसोबतही आज चर्चा करून त्यांना याबाबतच्या कारवाईचे निर्देश दिले जाणार आहेत.
सध्या इस्लाम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर 3 मे रमजान ईद पर्यंत मनसे सांमजस्याची भूमिका घेत असल्याचं म्हटलं आहे पण नंतर भोंगे उतरवले नाहीत तर आक्रमक होण्याचा इशारा मनसेने दिला आहे.