Lokmanya Tilak Award Ceremony Pune: PM नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार, शरद पवार राहणार कार्यक्रमास उपस्थित
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अशीच भूमिका घेतली होती.
Lokmanya Tilak Award To PM Narendra Modi: अवघ्या राज्याचे लक्ष आज पुणे शहराकडे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान पुण्यत येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आणि भारतीय जनता पक्षाने अवलंबलेले राजकारण पाहता पवार यांनी या कार्यक्रमास जाणे टाळावे, अशी भूमिका महाविकासआघाडीने घेतली होती. मात्र, पवार अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणारच असल्याचे समजते.
महाविकासआघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवेसना (UBT) पक्षाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते की, शरद पवार यांनी पुण्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास उपस्थित राहून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करु नये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अशीच भूमिका घेतली होती. दरम्यान, एक प्रकारचा दबाव तयार झाला असतानाही शरद पवार यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणे पसंत केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौरा आणि कार्यक्रम
- सकाळी 10.15 वाजता पुणे विमानतळावर आगमन
- सकाळी 11.00 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा
- दुपारी 11.45 वाजता लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर आगमन
- दुपारी 12,45 वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालय मैदानावर विविध योजनांचा शुभारंभ
- मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी तब्बल 300 फलक लावले आहेत. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आक्रमक झाली आहे. मणीपूर प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अवाक्षर बोलत नसल्याने काँग्रेसने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पंतप्रधान येणार म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. प्रशासनाने शहरात तब्बल 7 हजार पोलीस तैनात केले आहेत.