लोकसभा निवडणूक 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची संगमनेर येथे आज सभा

त्यामुळे राज ठाकरे आणि विरोधकांनी केलेल्या आरोप आणि विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

Pm Narendra Modi, Rahul Gandhi | (Photo Credit: Facebook)

Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 2019 च्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. प्रचारास आता शेवटचे तीनच दिवस बाकी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी प्रचाराला गती घेतली असून, आज या दोघांच्या तोफा अनुक्रमे मुंबई आणि संगमनेर येथे धडाडणार आहेत. नरेंद्र मोदी मुंबई येथील बांद्रा-कुर्ला (Mumbai Bandra Kurla) कॉम्प्लेक्स येथे तर, राहुल गांधी हे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) येथे जाहीर सभेला संबोधीत करतील. या दोन्ही सभा आज (शुक्रवार, 26 एप्रिल 2019) संध्याकाळी होणार आहेत.

ऐनवेळी सभास्थळात बदल

सुरुवातीला राहुल गांधी यांची उद्या (26 एप्रिल 2019) संगमनेर येथे पार पडत असलेली सभा ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सभास्थळात बदल करत ही सभा संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर आयोजित करण्यात आली. राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यापासून आतापर्यंत ते एकदाही नगर जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे उद्या पार पडत असलेल्या संगमनेर येथील सभेबाबत काँग्रेसध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण आहे.

काँग्रेसच्या गोटात उत्सुकता आणि उत्साह

शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) आणि नाशिक (Nashik) लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) तसेच दिंडोरी (Dindori) लोकसभा मतदारसंघ उमेदवार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राहुल गांधी यांनी मुंबई वगळता उर्वरीत महाराष्ट्रात फारशा सभा घेतल्या नव्हत्या. मात्र, राहुल गांधी यांच्या सभांना देशभरात मिळत असलेला पाठिंबा पाहता महाराष्ट्रात या सभेला कसा प्रतिसाद मिळेल. तसेच, या सभेत राहुल गांधी काय बोलतील याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, अहमदनगर: राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा, अशोक चव्हाण यांनी दिली माहिती)

काय बोलणार नरेंद्र मोदी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या जाहीर भाषणांमधून रान उठवले आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि विरोधकांनी केलेल्या आरोप आणि विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.