लोकसभा निवडणूक मतदान दुसरा टप्पा: महाराष्ट्रात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह दिग्गजांच्या भविष्याचा मतदार करणार फैसला

पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात विदर्भातील एकूण 7 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. निवडणूक मतदान विविध टप्प्यांत पार पडत असले तरी, सर्व मतदारसंघातील निकाल एकाच दिवशी लागणार आहे.

Representational Image| (Photo Credits: PTI)

Lok Sabha Elections Phase 2 Voting In Maharashtra: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha elections 2019) मतदान प्रक्रिया देशभरात एकूण 7 टप्प्यात पार पडत आहे. या प्रक्रियेचाच एक भाग असलेला दुसरा टप्पा आज (18 एप्रिल 2019) महाराष्ट्र आणि देशभरात पार पडतो आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्यासाठी एकूण 48 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडते आहे. यात बुलढाणा (Buldhana), अकोला (Akola), अमरावती(Amravati), मराठवाडय़ातील हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded), परभणी (Parbhani), बीड (Beed), उस्मानाबाद (Osmanabad), लातूर (Latur) आणि सोलापूर (Solapur) आदी मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan), माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde), बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar), आनंदराव अडसूळ, प्रीतम मुंडे या दिग्गजांसह राज्यातील १७९ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला मतदार EVM द्वारे करणार आहेत. त्यासाठी सकाळी 7 वाजलेपासून मतदानाला सुरुवातही झाली आहे.

दरम्यान, मतदान सुरळीत पार पडावे. शांतता आणि सुव्यवस्थेला कोणताही धोका लागू नये. यासाठी निवडणूक आयोगाने पुरेशी काळजी घेतली आहे. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत असलेल्या 10 मतदारसंघात तब्बल एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार आहेत. या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी २० हजार ७१६ मतदान केंद्रे उपलब्ध करुन दिली आहेत. मतदान केंद्र परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असला तरी, ३८२ मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून ओळखली जात अल्याने तेथे अत्यंत कडक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी २१०० मतदान केंद्रांवरील थेट प्रक्षेपणाद्वारे तेथील मतदान प्रक्रियेवर बारीक नजर ठेवली जात असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, LS Polls 2019 Phase 2 Voting:महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2019 मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात सुशील कुमार शिंदे, अशोक चव्हाण, प्रकाश आंबेडकर यांचं भवितव्य मतदान पेटीत होणार बंद)

लोकसभा निवडणूक 2019: दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या
लोकसभा मतदार संघाचे नाव संवेदनशील मतदार केंद्रांची संख्या
सोलापूर 71
परभणी 64
नांदेड 48
अमरावती 37
बीड 37
एकूण संवेदनशील मतदान केंद्र संख्या 382

लोकसभा निवडणूक मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिल रोजीच पार पडला आहे. पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात विदर्भातील एकूण 7 लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार पडली. निवडणूक मतदान विविध टप्प्यांत पार पडत असले तरी, सर्व मतदारसंघातील निकाल एकाच दिवशी लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघासोबतच तामिळणाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आसाम, बिहार आणि ओडिसा या राज्यांमध्येही लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.