मंत्री चंद्रकांत पाटील यांना अजित पवार यांचं खुलं आव्हान म्हणाले 'हिंमत असेल तर माढ्यातून लढाच'
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांचा पराभव होईल. अर्थात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतू, माढा लोकसभा मतदारसंघातून पवार यांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल.
Lok Sabha Elections 2019: आयुष्यात कधीही खासदारकी लढले नसलेले मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आम्हाल सल्ले देऊ लागले आहेत. ते आता काहीही बरळत आहेत. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेलाय हेच कळेना झालंय, असा टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट आव्हान दिले आहे की, 'हिंमत असेल तर माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha constituency) खासदारकी लढून दाखवा.' पिंपरी चिंचवड येथील भोसरी येथे झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.
'आम्हाला सल्ले देत उगाच गरळ ओकू नका'
या वेळी बोलताना अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला फुकटचे सल्ले देणे बंद करावे. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळावी. ती कशी व्यवस्थित ठेवता येईल याची काळजी घ्यावी. आम्हाला सल्ले देत उगाच गरळ ओकू नये. चंद्रकांत पाटील यांच्या इतकीच हिंमत असेल तर, त्यांनी शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हानच अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. अजित पवार यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी केलेल्या टीकेची किनार होती. (हेही वाचा, मावळ लोकसभा मतदारसंघातून आर आर पाटील यांच्या कन्या स्मीता पाटील-थोरात यांना राष्ट्रवादीचे तिकीट?)
काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, आगामी लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांचा पराभव होईल. अर्थात त्यांच्याबद्दल मला आदर आहे. परंतू, माढा लोकसभा मतदारसंघातून पवार यांच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. पवार यांनी वयाचा आणि आपल्या प्रकृतीचा विचार करता लोकसभा निवडणूक लढवू नये असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणातून पवार यांना दिला होता. याच पार्श्वभूमिवर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर तोफ डागली आहे.