गडचिरोली: सी-60 कमांडो पथकावर नक्षलवादी हल्ला, 3 जवान जखमी; मतदान संपल्यावर घडली घटना

दरम्यान, नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्राप्त माहितीनुसार नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर हल्ला करताना आईडीचा स्फोट केला. तसेच, हा स्फोट झाल्यावर त्यांनी जवानांवर गोळीबारही केला.

Representational Image | (Photo Credit: PTI)

Lok Sabha Elections 2019: गडचिरोली (Gadchiroli) येथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा सी-60 कमांडो (C-60 Commando Squad) पथकावर हल्ला केला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात सी-60 कमांडो पथकातील 3 जवान जखमी झाले. एटापल्ली (Etapalli) तालुक्यातील पुलसलगोदी परिसरात ही घटना घडली. गेल्या काही तासांतील नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे. तर, आजच्या दिवसातील ही दुसरी घटना आहे.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सी-60 कमांडो पथकातील जवान बेस कॅम्पवर परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. प्राप्त माहितीनुसार नक्षलवाद्यांनी कमांडो पथकावर हल्ला करताना आईडीचा स्फोट केला. तसेच, हा स्फोट झाल्यावर त्यांनी जवानांवर गोळीबारही केला.

प्राप्त माहितीनुसार आज सकाळी साडेआकराच्या सुमारासही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला अत्यंत दुर्गम समजल्या जाणाऱ्या वाघेझरी येथे केला. हा हल्ला करताना नक्षलवाद्यांनी मतदान केंद्राजवळ भुसुरुंग स्फोट घडवून आणला. मात्र या स्फोटात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तसेच, कोणीही जखमीही झाले नाही. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019 Phase 1 Voting: सुरक्षेच्या कारणास्तव गडचिरोली मध्ये ऐनवेळी बदलली मतदान केंद्र)

दरम्यान, नक्षलवाद्यांनी काल (बुधवार, 10 मार्च) घडवून आणलेल्या हल्ल्यात एक जवान जखमी झाला होता. हा हल्ला एटापल्ली तालुक्यातील जांभीया गट्टा या ठिकाणी झाला. या हल्ल्यावेळीही नक्षलवाद्यांनी आयडीचा स्फोट घडवून आणला.