MVA On VBA: आता प्रस्ताव नाही! आलात तर सोबत नाहीतर सोबतीशिवाय; 'वंचित' बाबत 'मविआ'चा आक्रमक पवित्रा
अनेक चर्चा, प्रस्ताव आणि बैठका निष्पळ ठरल्यानंतर आता 'आलात तर सोबत नाहीतर तुमच्या शिवाय', अशा विचारात मविआ (MVA) असल्याचे समजते.
MVA Seat Sharing In Maharashtra: लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना वंचित बहुजन आघाडी (Vanchti Bahujan Aghadi) द्वारे केल्या जाणाऱ्या मागण्यांमुळे घायकुतीला आलेल्या महाविकासआगाडीने आता आक्रमक पवित्रा घेतल्याचे वृत्त आहे. अनेक चर्चा, प्रस्ताव आणि बैठका निष्पळ ठरल्यानंतर आता 'आलात तर सोबत नाहीतर तुमच्या शिवाय', अशा विचारात मविआ (MVA) असल्याचे समजते. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) नेत्यांची एक काल (16 मार्च) बैठक पार पडली. या बैठकीत आता अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला एकही प्रस्ताव द्यायचा नाही, असे या बैठकीत ठरल्याचे समजते. अर्थात, याबाबत मविआतील कोणत्याही नेत्याने अधिकृत दुजोरा दिला नाही.
लोकसभा निवडणूक 2014 (Loksabha Election 2024) जाहीर झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने तशी घोषणाही केली. आदर्श आचारसंहिताही लागू झाली. परंतू, असे असले तरी, जागावाटपावरुन सुरु असलेला संघर्ष अजूनही मिटला नाही. हा तिढा कायमच आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी प्रत्येक वेळी नवा प्रस्ताव आणि नवी मागणी करत आहे. त्यामुळे चर्चा करायची तरी कशी हा प्रश्न मविआ नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. वंचितकडून आलेल्या अनेक प्रस्तावांवर मविआमध्ये चर्चा झाली. तसेच, मविआकूनही वंचितला अनेक प्रस्ताव गेल्याचे समजते. तरीही त्यावर तोडगा न निघाल्याने मविआ बचावात्मक पवित्र्यातून बाहेर आल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi on BJP and RSS: भाजपमध्ये 'ती' हिंमत नाही, ते फक्त बोलतात, हिंदुस्तान आमच्यासोबत- राहुल गांधी)
शिवसेना (UBT), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रीय काँग्रेस हे महाविकासआघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहेत. या तिघांमध्ये जागावाटपाची अंतिम बोलणी पूर्ण झाली आहेत. यामध्ये तिन्ही पक्षांनी मिळून किती आणि कोणत्या जागा लढायच्या याबाबत एकमत झाले. तसेच, तिन्ही पक्षांनी मिळून लढवायच्या जागा सोडून उर्वरीत जागांवर राजू शेट्टी यांच्यासारख्या मित्रपक्षांना काही जागा सोडायच्या यावर विचारविनिमय झाला. अंतिम बैठकीवेळी वंचित बहुजन आघाडीने तब्बल 17 जागा मागितल्यामुळे महाविकासआघाडीही अवाक झाली. परिणामी आता वंचितला कोणताच प्रस्ताव द्यायचा नाही, असा इराता मविआने केल्याचे समजते. दुसऱ्या बाजूला मविआकडून वंचितसाठी 4 जागा सोडण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महाविकासआघाडीतील जागावाटप पूर्ण झाले आहे. लवकरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल असा विश्वास शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता भारत जोडो न्याय यात्रेची सांगता होत आहे. शिवाजी पार्क येथील सांगता सभेने यात्रेचा शेवट होईल. या वेळी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे, यांच्यासह देशभरातील इंडिया आगाडीतील नेते या सभेस उपस्थित राहणार आहेत.