Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक जागा वाटप सूत्र ठरविण्यासाठी मविआकडून समिती स्थापन;दिग्गज नेत्यांचा समावेश, घ्या जाणून
या समितीमध्ये शिवेसना (UBT), शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश आहे.
Lok Sabha Election MVA Seat Allocation Committee: राष्ट्रीय पातळीवर भारतीय जनता पक्ष आणि एनडीए विरोधात विरोधकांनी I-N-D-I-A (इंडिया) आघाडी स्थापन केल्यानंतर महारष्ट्रातही राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकासआघाडी द्वारा लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात जागावाटपासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिवेसना (UBT), शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी तीन सदस्यांचा समावेश आहे. तिन्ही पक्षांकडून जागावाटप अत्यंत सौहादार्हपणे पार पडेल यावर भर दिला जाणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (4 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही सर्वात मोठी अपडेट पुढे आली आहे.
महाविकासआघाडीकडून जागावाटप समितीमध्ये एकूण नऊ सदस्यांचा समावेश केला आहे. राष्ट्रीय पातळीवरही प्रत्येक राज्यात I-N-D-I-A (इंडिया) आघाडीत सहभागी असलेल्या घटक पक्षांची राज्यनिहाय एक समिती स्थापन केली जाईल, असे आगोदरच स्पष्ट करण्यात आले होते. ज्याचे पर्यावसन महाराष्ट्रातील समितीमध्ये पाहायला मिळते आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून कोणाला उमेदवारी मिळते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. पक्षात झालेले बंड, बहुसंख्येने विरोधी पक्षासोबत (सत्ताधारी भाजप) गेलेले आमदार खासदार यामुळे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमदेवार निवडीचे मोठेच आव्हान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर असणार आहे.
लोकसभा निवडणूक जागावाटप समितीमधील मविआचे सदस्य
शिवसेना (UBT)- अनिल देसाई, संजय राऊत, विनायक राऊत
NCP (शरद पवार गट)- जयंत पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड
काँग्रेस- पृथ्विराज चव्हाण, बसवराज पाटील, नसीम खान
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास आतापर्यंत महाविकासआघाडीतील सर्वच राजकीय पक्षांनी मोठा समजूतदारपणा दाखवला आहे. तो हा की, कोणत्याही जागेवर दावा सांगितला नाही किंवा कोणत्याही नेत्याने त्यावर भाष्य केले नाही. प्रसारमाध्यमांनी जर खोदून विचारलेच तर हे नेते आमची समितीच आणि पक्षाचे वरीष्ठ नेतेच त्यावर अधिकृत भाष्य करतील असे सांगत आहेत. त्यामुळे इतर वेळी एकमेकांच्या जागांवर केले जाणारे भाष्य, दावा यांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही I-N-D-I-A (इंडिया) आघाडीत समन्वय समितीद्वारे संवाद साधला जात आहे. त्यामुळे सध्यास्थितीत तरी विरोधकांमध्ये एकवाक्यता असल्याचे दिसते. हीच एकवाक्यता जागावाटप आणि भविष्यातील निवडणुकातही दिसणार का? याबबत उत्सुकता आहे. दरम्यान, भाजप प्रणित एनडीएने मात्र इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली आहे.