Dharashiv: धाराशिव येथे राजकीय वादातून मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला, एकाचा मृत्यू

ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Attack | Representational image (Photo Credits: pxhere)

Political Dispute in Dharashiv: सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी देशातील विविध ठिकाणी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातही आज लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदार मतदानासाठी मतदान केंद्रावर जात आहेत. दरम्यान, राजकीय गटांमध्ये राजकीय वाद उफाळून येण्याच्या घटना घडत आहे. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राजवळ घडलेल्या अशाच एका घटनेत दोन गटांमध्ये झालेल्या वादातून चाकूहल्ला झाला आहे. ज्यामध्ये एकाचा मृत्यू तर तीघे जण गंभीर जखमी झाले आहेत. राजकीय वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. घडल्या प्रकारामुळे परिसरातील तणाव आणि राजकीय वातावरण अधिकच चिघळण्याची शक्यता बोलली जात आहे.

भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात घडली घटना

धाराशिव जिल्ह्यात असलेल्या भूम तालुक्यातील पाटसांगवी गावात ही घटना घडली. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मतदान केंद्र परिसरात दोन राजकीय गटांमध्ये मतदार आणण्यावरुन वाद झाला. किरकोळ वादाचे पर्यावसन मोठ्या हाणामारीत आणि पुढे चाकूहल्ला होण्यात झाले. दोन्ही गट परस्परांवर चालून आल्याने वाद निर्माण झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले. तिघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. हल्ल्यामध्ये मृत झालेल्या तरुणाचे नाव समाधान पाटील असे आहे. तर, गौरव अप्पा नाईकनवरे असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. (हेही वाचा, Shinde vs Thackeray : हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा (Watch Video))

आरोपी फरार, पोलीस मागावर

चाकूहल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर आरोपी गौरव नाईकनवरे फरार आहे. पोलिसांनी घटनेची तातडीने नोंद घेतली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शिवाय जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. (हेही वाचा:Raigad Lok Sabha Election 2024: महाडमध्ये मतदानासाठी निघालेल्या मतदाराचा मृत्यू; रस्त्यातच चक्कर येऊन कोसळले)

उस्मानाबाद जिल्ह्यात प्रदीर्घ काळापासून गटागटांमध्ये राजकीय वाद

अधिक माहिती अशी की, भूम तालुक्यातील काही ठिकाणी पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने राजकीय वाद धुमसत होता. या ना त्या कारणाने वादाची ठिणगी पडत होती. या वादाला आज मतदान आणण्यावरुन पुन्हा एकदा तोंड फुटले आणि त्याचे पर्यावसन थेट मोठ्या हल्ल्यात झाले. ज्यामुळे एकाचा मृत्यू झाला. दरम्यान, हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या ओमराजी निंबाळकर गटाचा कार्यकर्ता असल्याचे समजते. त्याचा मृतदेह तालुका रुग्णालयात ठेवण्या आला असून ओमराजे हे रुग्णालयाला भेट देणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, राज्यभरामध्ये मतदान शांततेत पार पडत आहे. असे असले तरी काही ठिकाणी मात्र शांततेला गालबोट लावणाऱ्या घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये धाराशिव येथील घटनेचाही समावेश आहे. राज्यात इतरही काही ठिकाणी किरकोळ वाद आणि तशाच काहीशा घटना घडल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif