महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार? ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन वाढवणे गरजेचे आहे.

Shiv Sena Chief Uddhav Thackeray | (Photo: Facebook)

कोरोना विषाणूने महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाउन वाढवणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नुकतीच ठाकरे सरकारच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली आहे. दरम्यान, राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाउन (Lockdown) वाढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे. तसेच लॉकडाउनचा चौथा टप्पा अनोख्या पद्धतीचा असेल, असेही नरेंद्र मोदी म्हणाले होती. यामुळे हे लॉकडाऊन कसे असेल हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवण्याशिवाय पर्याय नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या संदर्भात महाविकास आघाडीतील महत्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. यात राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याविषयी चर्चा झाली, अशी माहिती समोर आली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील बैठकीला हजर होते. हे देखील वाचा- BMC: मुंबई येथील धारावी परिसरात आज आणखी 33 नवे रुग्ण आढळले; आतापर्यंत 1 हजार 061 लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग तर, 42 जणांचा मृत्यू

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 25 हजार 922 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यापैकी 975 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 5 हजार 547 जण कोरोनामुक्त झाले आहे.