Lockdown: लॉकडाऊन रात्री 8 ला जाहीर करायला काय नोटबंदी नव्हे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जयंत पाटील यांची टीका

सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता. असे ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोदींवर टीका केली आहे.

PM Narendra Modi & Jayant Patil (Photo Credits: PTI)

"जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन (Lockdown) हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता", असे ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोदींवर टीका केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी देशवासीयांशी संवाद साधताना कोरोनाचे संकट लक्षात घेता काल रात्री 12 वाजल्यापासून देशातील सर्व राज्यात लॉक डाऊन जारी करण्यात येईल असे सांगितले होते, जर का या 21 दिवसात आपण हे संकट रोखू शकलो नाही तर देश तब्बल 21 वर्ष मागे जाईल त्यामुळे होणारा अनर्थ टाळण्यासाठी सर्वांनी या लॉक डाऊनला गांभीर्याने घ्यावे अशी विनंती सुद्धा मोदींनी केली होती. मात्र या घोषणेच्या नंतर अनेक नागरिकांनी भीतीपायी दुकानात, एटीएम बाहेर गर्दी करायला सुरुवात केली, यावरून सुनावताना जयंत पाटील यांनी मोदींच्या घोषणेवर टीका केली.

हे देखील वाचा- Coronavrius: कोरोना व्हायरस संदर्भातील शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात 'हेल्पलाईन नंबर' ची घोषणा

जयंत पाटील यांच्या ट्विटनुसार, जर का मोदींनी आपण लॉक डाऊन रात्री 12 वाजता जारी करणार आहोत ही घोषणा काल सकाळीच केली असती तर लोकांची एवढी घाबरगुंडी उडाली नसती, निदान त्यांना सर्व तयारीसाठी वेळ मिळाला असता, मात्र या महत्वाच्या घोषणेसाठी सुद्धा मोदींनी रात्री 8  ची वेळ निवडून 4 तास वेळ दिली होती. यावेळी नोटबंदीच्या निर्णयाचा दाखला देत जयंत पाटील यांनी लॉक डाऊन 8 वाजता जाहीर करायला काय नोटबंदी आहे का? असा सवालही केला आहे.

जयंत पाटील ट्विट

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉक डाऊन बाबत माहिती देताना अत्यावश्यक सेवा या 21 दिवस सुद्धा सुरु राहणार आहेत हे स्पष्ट केले. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये.” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.