Lockdown in Maharashtra: महाराष्ट्रातील लॉकडाऊन चार टप्प्यांमध्ये हटवला जाण्याची शक्यता; राजेश टोपे यांचे संकेत
सर्व काही गोष्टी ठिक आणि नियंत्रणात असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याच्या टास्क फोर्ससोबत चर्चा करतील. परंतू, सर्वच निर्बंध हटवले जातील अशा भ्रमात कोणीही राहू नये.
पहिल्या लाटेच्या तुलनेत महाराष्ट्राला कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेत अधिक फटका बसला. संक्रमित रुग्णांची संख्या हाताबाहेर जाऊ लागल्याने महाराष्ट्र सरकारने वेळीच पावले टाकली आणि राज्यात लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लागू केला. आता येत्या 31 मेला लॉकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे आता राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) हटणार की पुन्हा वाढवला जाणार याबाबत उत्सुकता आहे. राज्याचे आरोगयमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत काही संकेत दिले आहेत. तसेच, इंडिया टुडेनेही याबाबत वृत्त दिले आहे. टोपे यांचे संकेत आणि प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार राज्यातील लॉकडाऊन चार टप्प्यात हटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सावधानता बाळगत राज्यातील लॉकडाऊन एकूण चार टप्प्यात हटवला जाण्याची शक्यता आहे. यात पहिल्या टप्प्यात राज्यातील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. दुसऱ्या टप्प्यात दैनंदिन गरजा आणि अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी मिळू शकते. एकआडएक दिवस दुकाने सुरु ठेवण्याच्या पर्यायांवरही विचार होऊ शकतो. तिसऱ्या टप्पयात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना सशर्थ परवानगी मिळू शकते. तसेच हॉटेल्सही 50% क्षमतेने सुरु होऊ शकतात. तर चौथ्या टप्प्यात धार्मिक स्थळं, मुंबई लोकल आदी गोष्टींवरील निर्बंध कायम ठेऊन लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. (हेही वाचा, COVID-19 Vaccination In Mumbai: मुंबई मध्ये आजपासून स्तनदा मातांनाही मिळणार Walk-in कोविड लस; पण हे असतील नियम!
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात लॉकडाऊनबाबत भाष्य केले होते. यावेळीही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, लॉकडाऊन हटविणे हे नागरिकांच्याहातात आहे. जर सर्व निर्बंध आणि नियम योग्य पद्धतीने पाळल्यास लॉकडाऊन शिथील केला जाऊ शकतो.