Lockdown in Amravati: अमरावती मध्ये लॉकडाऊनची आवश्यकता नाही- पालकमंत्री यशोमती ठाकूर
काही आठवड्यांपूर्वी केलेल्या लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून आता लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.
अमरावती (Amravati) जिल्ह्यात गेल्या काही आठवड्यांपूर्वी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला होता. नागरिकही नियमांचे पालन करत होते. त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली असून आता लॉकडाऊनची आवश्यकता नसल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेटही घेणार आहेत. (अमरावतीत लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद; नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट)
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांची वाढ पाहता 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावर यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्याकरीता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या मुद्द्यावरुन यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती त्यांच्यासमोर सादर करणार आहेत. तसंच राज्य सरकारने सोमवार ते शुक्रवार दरम्यान लागू केलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याची मागणी त्या करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, शनिवार-रविवारी असलेल्या निर्बंधांवर त्यांनी कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही.
अमरावती जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन होता. त्यानंतर 22 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. पुन्हा या कालावधीत 8 मार्च पर्यंत वाढ करण्यात आली. लॉकडाऊनच्या नियमांचे अमरावतीकरांनी व्यवस्थित पालन केले असून त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रुग्णसंख्या आटोक्यात येऊनही पुन्हा तेथील नागरिकांवर निर्बंध लादणे योग्य नाही. याच पाश्वभूमीवर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, काल महाराष्ट्रात 55,469 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 297 जणांचा मृत्यू झाला आहे. 34,256 कोरोनावर मात केली आहे. या नव्या वाढीमुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या 31,13,354 इतकी झाली असून मृतांचा आकडा 56,330 वर पोहचला आहे. सध्या राज्यात 4,72,283 सक्रीय रुग्ण असून 25,83,331 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.