अमरावती मध्ये 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन तर यवतमाळ मध्ये कडक निर्बंध लागू
कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमरावती जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमरावती (Amravati) जिल्ह्यात 21 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री 8 ते सोमवार (22 फेब्रुवारी) सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध कायम राहणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवल (Shelesh Naval) यांनी सांगितले आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत. (Amravati Coronavirus Guidelines: लग्नसोहळ्यात निर्धारित आकड्यापेक्षा जास्त उपस्थिती आढळल्यास हॉलचालकाला 50 हजार दंड, तर वधू- वर पक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार)
ANI Tweet:
विदर्भातील यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही कोरोना रुग्णवाढीमुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र ल़ॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी एमडी सिंग (MD Singh) यांनी दिली आहे. 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. तर रेस्टोरेंट्स, कार्यक्रमांचे हॉल 50 टक्क्यांहून कमी लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर लग्नसोहळ्यातही 50 लोकांना जमण्याची मुभा असेल. याशिवाय 5 किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे.
राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यात अमरावती, अकोला, यवतमाळ या ठिकाणी रुग्णवाढ लक्षणीय आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले असून विविध नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. तसंच नागरिकांना देखील सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.