महाराष्ट्र: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात स्थानिक निवडणुका 3 महिने पुढे ढकलल्या

या काळात लोकांची गर्दी टाळावी म्हणून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Gram Panchayat Elections | (File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट वेगाने आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात आजपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे तर नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता निवडणूकांबाबतीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात लोकांची गर्दी टाळावी म्हणून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे राज्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडल्यात. त्यानंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँका, पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. पण, राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 3 महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.हेदेखील वाचा- Maharashtra New Corona Guidelines: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आजपासून कडक निर्बंध लागू; काय सुरू, काय बंद राहणार जाणून घ्या

निवडणूका म्हटल्या की, गर्दी ही ओघाओघाने आलीच. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू शकतो. त्यामुळे या निवडणुका तूर्तास तरी पुढे ढकलाव्या असा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महापालिका, कोल्हापूर महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आधीच लांबला आहे. त्यातच आता कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे निवडणुकींचा निर्णयही लांबणीवर टाकण्यात आला आहे.

दरम्यान आजपासून म्हणजेच 5 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली. याशिवाय कोरोना विषाणूची लागण होण्यापासून रोखण्यासाठी खाजगी कार्यालये, थिएटर आणि सलून इत्यादी बंद करणे यासारख्या कठोर निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवारी रात्री आठ ते सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. याव्यतिरिक्त, आठवड्याच्या सर्व दिवस कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशांची अंमलबजावणी केली जाईल.