Latur Crime: केवळ 500 रुपयांच्या वादातून तरुणाची आईसमोर हत्या, 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा; लातूर येथील घटना
लातूर जिल्ह्यात (Latur Crime) खळबळ उडवून देणारे हे प्रकरण एप्रील 2008 मध्ये घडले होते. या प्रकरणाचा तब्बल 4 वर्षांनी निकाल लागला.
लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने (Latur District and Sessions Court) एका तरुणाच्या हत्या प्रकरणात 8 दोषींना जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) ठोठावली आहे. लातूर जिल्ह्यात (Latur Crime) खळबळ उडवून देणारे हे प्रकरण एप्रील 2008 मध्ये घडले होते. या प्रकरणाचा तब्बल 4 वर्षांनी निकाल लागला. न्यायलयाने दोषींना कठोर शिक्षा ठोठावली. प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही. गुजराथी यांनी सर्व आरोपींना दोषी ठरवले व कलम 302 नुसार जन्मठेपीची शिक्षा सुनावली. सरकारी वकील म्हणून अॅड. संतोष देशपांडे यांनी काम पाहिले. दोषींमधये एक महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे केवळ 500 रुपयांसाठी या आठ जणांनी एका तरुणाची त्याच्या आईसमोरच हत्या केली होती. तसेच, या प्रकाराचे चित्रिकरणही केले होते. आरोपींना शिक्षा ठेठावली तेव्हा नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
हाजीअली दस्तगीर शेख, युसुफ फारुख शेख, जब्बार सत्तार सय्यद, शन्नू अन्वर सय्यद, अन्वर दस्तगीर सय्यद, दौलत बाबुमिया शेख, सलीम नजीर सय्यद व बाळू पंडीत सुर्यवंशी (सर्व राहणार लातूर) अशी गुन्हेरांची नावे आहेत. घटनेबाबत माहिती अशी की, शादुल शेख रा. अंजलीनगर या तरुणाने लातूर शहरातील टाऊन हॉल मैदानावर बर्फाचे गोळे विकण्याचा गाडा होता. हा गाडा लावल्याबद्दल आरोपींनी शादुल शेख यांच्याकडेएप्रिल 2018 मध्ये 500 रुपयांची मागणी केली. ही मागणी पूर्ण करण्यास शादुलने नकार दिला. त्यामुळे या नकाराचा राग मनात धरुन आरोपींनी शादुल यास मारहाण केली. क्रृरपणे केलेल्या मारहाणीत शादुल शेख याचा मृत्यू झाला. ही घटना त्याच्या आईच्या समोरच घडली. धक्कादायक म्हणजे आरोपींनी मारहाणीचा व्हिडिओही बनवला होता. (हेही वाचा, Rape: पुण्यात 6 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
हाणामारीची घटना घडण्यापूर्वी आरोपी आणि शादुल शेख यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे एके दिवशी आरोपी अन्वर सय्यद याने शादुल यास सकाळी 11 वाजणेच्या सुमारास घरी बोलावले. तेथेही त्याला 500 रुपयांची मागणी झाली. त्यावेळीही शादुलने नकार देताच अन्वर सय्यद याने त्याच्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये त्याला उलटे टांगले आणि इतर आरोपींच्या मदतीने मारहाण केली. या वेळी त्याच्या नका तोंडात चटणीची पूड टाकण्यात आली होती. या वेळी आरोपी दारुच्या नशेत तर्र होते. आरोपींपैकी एक असलेल्या दस्तगीर शेख याने तर शादुलच्या आईला फोन केला आणि 'आपण तुझ्या मुलाला मारहाण करतो आहे. हवे तर सीन पाहायला ये', असे सांगीतले. शादुलची आई घटनास्थळी दाखल झाली होती तेव्हा मारहाण सुरुच होती. तीने मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी न जुमानता शादुलचा जीव घेतला.