मांजाने कापला गळा; डॉक्टर तरुणीचा पुण्यात मृत्यू, परिसरात खळबळ

कृपाली निकम असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

डॉ. कृपाली निकम (छायाचित्र सौजन्य - सोशल मीडिया)

पतंग उडवणाऱ्या अज्ञातांची हौस पुण्यातील एक डॉक्टर महिलेच्या जीवावर बेतली. पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाने गळा कापल्याने पुण्यातील २६ वर्षीय डॉक्टर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास नाशिक फाटा परिसरात घडली. कृपाली निकम असे या डॉक्टर महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, डॉ. कृपाली या आपल्या मैत्रिणाला सोडण्यासाठी पुणे स्टेशनला जात होत्या. त्यासाठी त्या मित्राची अॅक्टिव्हा घेऊन जाणार होत्या. दरम्यान, त्या पिंपळे सौदागरहून भोसरीला निघाल्या. दरम्यान, नाशिक फाटा परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा लटकत होता. हा मांजाच डॉ. कृपाली यांच्या गळ्याला लागला. या घटनेत डॉ. कृपाली यांच्या गळ्याला मोठी जखम झाली. जवळपास गळाच कापलाच गेला. यात खूप रक्तस्त्राव झाला.

डॉ. कृपाली यांना जवळच असलेल्या संत ज्ञानेश्वर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. दरम्यान, पतंग कोण उडवत होतं. मांजा कुणी वापरला हे सर्वच प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरवर्षी ते अनुत्तरीतच राहतात. मकर संक्रांतीच्या काळात मात्र, पतंग उडवताना मांजा वापरणाऱ्यांची हौस अनेकांच्या जीवावर येत असते.