Ladka Bhau Yojana: राज्यात लाडकी बहिण योजनेनंतर 'लाडका भाऊ योजना'; सुशिक्षित बेरोजगारांना मिळणार 10 हजारांपर्यंत स्टायपेंड

समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल करत लाडका भाऊ योजना अस्तित्वात आणली.

CM Eknath Shinde | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Ladka Bhau Yojana in Maharashtra: महायुती सरकारच्या कार्यकाळातलं शेवटचं अधिवेशन काल पार पडलं. अधिवेशनादरम्यान, विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर लाडका भाऊ योजना काढा असं विरोधकांकडून म्हणण्यात येत होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर देताना,'सख्ख्या भावाला कधी जवळ केलं नाही आणि लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) काढा म्हणतात,असे खोचक उत्तर दिले. त्याशिवाय, लाडका भाऊ योजनाही आणली. त्यामुळे आता राज्यातील तरूणांना सरकारकडून काही खास सवलती आणि फायदे मिळणार आहेत.

लाडका भाऊ योजनेविषयी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आम्ही लाडका भाऊ योजना काढली आहे. ज्यात दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला 8 हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे.'

दरम्यान, राज्यात बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे.या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.