Mumbai Local Horror: कुर्ला स्थानकावर मोबाईल चोराच्या हल्ल्यात धावत्या लोकल मधून पडून तरुणी जखमी; आरोपी ताब्यात
मुंबईच्या मध्य रेल्वे (Central Railway) मार्गावरील कुर्ला (Kurla) स्थानकावर चालत्या ट्रेन मधून एका विद्यार्थिनीच्या हातातला मोबाईल फोन खेचल्याने तोल जाऊन ही तरुणी ट्रेन मधून पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेत लॉ चे शिक्षण घेणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणीच्या डोक्याला मार लागल्याचे सांगण्यात येते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार जखमी तरुणीची स्थिती सध्या स्थिर असून तिला 24 तासांच्या वैद्यकीय निरक्षणाखाली ठेवले आहे.
TOI च्या माहितीनुसार,मंगळवारी रात्री ही घटना घडत असताना आरपीएफच्या (RPF) अधिकाऱ्याने प्लॅटफॉर्म वर तीव्र हालचाल पाहिल्यावर तातडीने मोबाईल चोराला पकडले, पुढे झालेल्या चौकशीत या चोराचे नाव 'उमेश गवळी' असल्याचे समोर आले आहे. 21 वर्षीय उमेश हा चुनाभट्टीत आपल्या आई व दोन भावांसोबत राहत असून त्याच्या नावावर आजवर एकूण 9 गुन्हेगारी आरोप दाखल झाले आहेत. उमेशच्या आई आणि भावाच्या नावावरही अनेक गुन्हेगारी खटले आढळून आले आहेत.
घटनास्थळी उपस्थित आरपीएफच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्र सेक्युरिटी फोर्सच्या (MSF)च्या अधिकाऱ्याच्या सह्हायाने गुन्हेगाराला पकडले. त्यांनतर संबंधित जखमी तरुणीला देखील लगेचच जवळच्या राजावाडी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले. या तरुणीच्या डोक्याला पाच टाके लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रेल्वे रुळांवर बसून PUBG गेम खेळणे जीवावर बेतले, रेल्वेच्या धडकेने दोन तरुणांचा जागीच मृत्यू
या मुलीच्या वडिलांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार, एका लॉ कंपनीत इंटर्न म्हणून काम करणाऱ्या या तरुणीने रात्री 8.15 च्या सुमारास परेल स्थानकावरून ट्रेन पकडली, विद्याविहारला उतरायचे असल्याने ती दरवाजा जवळच उभी होती. ट्रेन सुरु झाल्यावर या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यात घुसून उमेश गवळी या चोराने तिच्या हातातला मोबाईल ओढून घेतला. यावेळी मोबाईल सोबतच जोडलेले इअरफोनही खेचले गेल्याने ही तरुणी देखील ट्रेनच्या बाहेर पडून ओढली गेली.
या नंतर लगेचच संबंधित गुन्हेगाराला चौकशी करता जवळच्या आरपीएफ (RPF)कार्यालयात नेण्यात आले तसेच चोरलेला मोबाईलही जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान उमेश गवळीच्या पूर्व गुन्हेगारी रेकॉर्ड्सची पडताळणी केली असता चोरी, ड्रग्स हाताळणी या गुन्ह्यांमध्ये वडाळा, नेहरू नगर, कल्याण, कुर्ला या परिसरात आरोपी असल्याचे समोर आले आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रवासा दरम्यान सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले आहेत