कोरेगाव-भीमा हिंसा हा पूर्वनियोजित कटच: सत्यशोधन समितीचा अहवाल

या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकार कारवाई करणार की आणखी काही वेगळी भूमिका घेणार याबाबत सर्वांणा उत्सुकता आहे.

(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

मुंबई: कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणी सत्यशोधक समितीच्या अहवालात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यासह पोलिसांच्या गाफिलपणावर ठपका ठेवण्यात आला आहे. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणात हिंसा भडकवण्यासाठी परिस्थिती निर्माण केली होती. तर, ही हिंसा घडत असताना किंवा तशी परिस्थिती घडत असताना पोलीस गाफील राहिले असे या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र सरकार कारवाई करणार की आणखी काही वेगळी भूमिका घेणार याबाबत सर्वांणा उत्सुकता आहे.

प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर

कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणेवरही सर्व स्तरातून जोरदार टीका झाली होती. त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी पुण्याचे उपमापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या अध्यक्षखाली सत्यशोधन समिती स्थापण करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल कोल्हापूरच्या पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला. महत्त्वाचे म्हणजे या समितीची स्थापना करण्याची सूचनाही कोल्हापूर पोलीस महानिरीक्षकांनीच केली होती.

अहवालात अनेक गौप्यस्फोट

दरम्यान, या अहवालात अनेक गौप्यस्फोट केल्याची माहितीही आहे. वढू बुद्रुक आणि गोविंद गायकवाड यांच्या इतिहासाची मोडतोड करण्यासाठी मिलिंद एकबोटे यांनी धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीची स्थापना केली होती, असेही या अहवालात म्हटले आहे. तसेच, ही हिंसा घडणार असल्याची कल्पना सणसवाडीला होती. गोविंद गायकवाड यांची माहिती देणारा संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावरील बोर्ड हटवून त्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवारांचा फोटो लावण्यात आला होता. वास्तविकता हा फोटो लावण्याची काहीच आवश्यकता नव्हती. हा प्रकार म्हणजे सवर्ण आणि इतर जातींमध्ये ताण-तणाव आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. मात्र, पोलिसांनी वेळीच योग्य ती पावले टाकली असती तर, पुढचा हिंसाचार टळला असता असेही या अहवालात म्हटले आहे.

सणसवाडीला हिंसेची कल्पना होती

संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरील गोविंद गायकवाडांची माहिती देणारा बोर्ड हटवून त्याजागी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवारांचा फोटो लावण्यात आला होता. हा फोटो लावण्याची काहीच गरज नव्हती. सवर्ण आणि इतर जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. पोलिसांनी वेळीच योग्य पाऊल उचलले असते तर ही हिंसा रोखता आली असती, असं सांगतानाच सणसवाडीतील लोकांना या हिंसाचाराची आधीच माहिती होती, त्यामुळेच गावातील दुकाने आणि हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यांनी पाण्याचे टँकर रॉकेलनं भरून ठेवले होते आणि गावात काठ्या आणि तलवारी आणून ठेवल्या होत्या, असा गौप्यस्फोटही करण्यात आला आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर ताशेरे

या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोरेगाव भीमामध्ये अशा घटना घडत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला होता. पोलिसांना हिंसाचाराची माहिती देणारे अनेक कॉल करण्यात आले. मात्र त्यांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. त्यामुळेच पोलीस आपल्यासोबत आहेत, काळजी करू नका, अशा घोषणा देण्यापर्यंत जमावातील काहींची मजल गेली,' असं सत्यशोधन समितीनं अहवालात नमूद केलं आहे.