Kolhapur महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी Online Booking अनिवार्य
मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्याने खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत.
कोरोना व्हायरस संकटामुळे (Coronavirus Pandemic) बंद असलेली राज्यातील मंदिरं नवरात्रोत्सवापासून (Navratri 2021) पुन्हा खुली केली जाणार आहेत. त्यामुळे साहजिकच मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ शकते. नवरात्रोत्सव असल्याने देवींच्या मंदिरांना भेट देणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असणार आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नसल्याने खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाकडून काही नियम लागू करण्यात आले आहेत. (Temples Reopen in Maharashtra: नवरात्रीच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुली होणार धार्मिक स्थळं)
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करणे अनिवार्य असणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशननंतरच भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. मात्र देवीसाठी ओटी किंवा साडी स्वीकारली जाणार नाही. मंदिर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत भाविकांसाठी खुले असेल. तर पालखी सोहळा हा रात्रीच्या वेळेस पुजारी, देवस्थानाचे सदस्य आणि काही पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडेल.
दरवर्षी नवरात्रोत्सवात मंदिरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतु, यंदा अशा प्रकारचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. मागील वर्षी देखील हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. तसंच प्रसाद वाटपही यंदा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
महालक्ष्मी मंदिराचे सेक्रेटरी शिवराज नाईकवडे यांनी सांगितले की, "नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येण्यापूर्वी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. तसंच मंदिरात येणाऱ्या भाविकांचे प्रवेशद्वारावरच सॅनिटायझेशन आणि थर्मल स्क्रिनिंग होणार आहे. भाविकांना केवळ दर्शन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रसाद, ओटी, साडी स्वीकारली जाणार नाही."
पूर्वेकडील गेटमधूनच प्रवेश करण्यास भाविकांना मुभा आहे. त्यानंतर बॅरिकेटर्सने दर्शनाच्या रांगा विभागल्या जातील. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी दक्षिण गेटमधून बाहेर पडावे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवात पंचमीला टेंबलाई मंदिरात होणारी ललित पंचमी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. ललित पंचमीनिमित्त देवी महालक्ष्मीची सजवलेली पालखी टेंबलाई मंदिरात नेली जाते, जिथे कोल्हापूरच्या राजघराण्याच्या उपस्थितीत 'कोहळा पूजन' केले जाते. या वर्षी हे सर्व उपक्रम अगदी कमी निमंत्रितांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने केले जातील.