Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, उमेदवारांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
चिंचवड येथून विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.
पुणे (Pune) जिल्ह्यातील विधानसभेच्या दोन रिक्त जागांसाठी म्हणजेच कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी मतदान आज सकाळपासून सुरु झाले आहे. चिंचवड येथून विठ्ठल काटे (NCP), भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन आघाडीच्या उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील चिंचवड, कसबा पेठ (Kasba Peth, Chinchwad Bypolls 2023)येथेही भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात मोठी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासणे रिंगणात आहेत. 2 मार्च रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे.
कसबा आणि चिंचवड अशा दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाचे नेते अजित पवार, शिवसेना यूबीटीचे आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसारख्या दिग्गज नेत्यांनी रोड शो, कॉर्नर सभा आणि जनतेच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला. (हेही वाचा, Pune Bypoll Election: कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अजित पवार आज रोड शो मध्ये होणार सहभागी)
जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कसबा पेठ मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या 2,75,428 असून त्यात 1,38, 550महिला मतदार आणि 1,36,87 पुरुष मतदार आणि पाच ट्रान्सजेंडर मतदार आहेत. कसबा पेठ पोटनिवडणूक एकूण 270 मतदान केंद्रांवर होणार असून, तेथे पोलिसांनी नऊ संवेदनशील मतदान केंद्रे केली आहेत.
पुणे पोलिसांकडून मतदानाच्या दिवशी पोलिस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 1300 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकूण 56,8954 पात्र मतदार 510 पूलिंग बूथवर मतदान करणार आहेत. पोलिसांनी या मतदारसंघातील 13 संवेदनशील मतदान केंद्रे चिन्हांकित केली असून 850 पोलिस कर्मचारी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी मतदारसंघात तैनात आहेत.
पोटनिवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) सारख्या निमलष्करी दले दोन्ही शहरांच्या पोलिसांना मदत करतील. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर दोन्ही जागांवर निवडणूक होणे आवश्यक होते. जी आता पार पडत आहे.