IPL Auction 2025 Live

कर्जत नगर परिषद निवडणूक निकाल 2019: शिवसेना भाजप युतीचा बहुमताने विजय; नगारध्यक्ष पदावर युतीच्या सुवर्णा जोशी विजयी, राष्ट्रवादी काँग्रेस भक्कम विरोधकाच्या भूमिकेत

नगराध्यक्षपदासाठी युतीच्या उमेदवार असलेल्या सुवर्णा जोशी (Suvarna Joshi) यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय संपादन केला.

Shivsena BJP's lead, NCP second position in Karjat Municipal Council Election | (Photo courtesy: archived, edited images)

Karjat Municipal Council Election Result 2019: राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम असला तरी, स्थानिक पातळीवर मात्र शिवसेना भाजप युती (Shiv Sena-BJP alliance) होत असल्याचे चित्र आहे. कर्जत नगर परिषद (Karjat Municipal Council) निवडणुकीचा निकाल नुकातच हाती आला. या निवडणुकीत शिवसेना-भाजप-आरपीआय युतीने स्पष्ट बहुमताने विजय मिळवला तर, नगराध्यक्षपदासाठी युतीचाच उमेदवार विजयी झाला. एकूण 18 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 10 जागांवर युतीने बाजी मारली तर, एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने 8 जागा जिंकल्या. नगराध्यक्षपदासाठी युतीच्या उमेदवार असलेल्या सुवर्णा जोशी (Suvarna Joshi) यांनी मतमोजणीत सुरुवातीपासूनच आघाडी घेत विजय संपादन केला.

कर्जत नगरपरिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी (सोमवार, 28 जानेवारी) सकाळी मतमोजणी पार पडली. नगराध्यक्षपदासाठी युतीच्या सुवर्णा जोशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. प्रतीक्षा लाड यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, सुरुवातीपासूनच आघाडी घेत सुवर्णा जोशी यांनीच बाजी मारली. अॅड. प्रतीक्षा लाढ यांना मतमोजणीदरम्यान सुरुवातीपासूनच आघाडीसाठी संघर्ष करावा लागला मात्र, जोशी यांची आघाडी त्यांना पार करता आली नाही. (हेही वाचा, शिवसेना-भाजप युतीचं कसं जमवायचं? भाजपचं जालना येथे तर, शिवसेनेची शिवसेना भवनात खलबतं)

राज्यात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की नाही याबाबत दोन्ही पक्षांमध्ये खलबतं सुरु आहेत. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर सुरु असलेल्या या खलबतांचा स्थानिक पातळीवर मात्र फार प्रभाव दिसून येत नाही. सध्यास्थितीत तरी शिवसेना, भाजपचे स्थानिक कार्यकर्ते स्थानिक निवडणुकीत एकत्र काम करुन विजय खेचून आणत असल्याचे चित्र आहे. असे असले तरी, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांवर या छोट्या छोट्या जय-पराजयाचा मोठा परिणाम होऊ शकतो.