KDMC Water Cut: कल्याण डोंबिवलीत पुढील तीन महिने सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार
पाणी कपातीच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होणार आहे.
कल्याण - डोंबिवलीत (KDMC Water Cut) पुढील तीन महिने येत्या सोमवारी आणि मंगळवारी पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन विभागातील नागरिकांना केले आहे. शासन आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा सोमवार, मंगळवारी 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री 12 ते मंगळवारी रात्री 12 या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिकेला विविध जलस्त्रोतांमधून होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
पुरेसा पाऊस पडेपर्यंत बारवी धरणातील पाणीसाठा समप्रमाणात असावा. कल्याण, डोंबिवली शहरांची पाण्याची तहान येत्या तीन महिन्याच्या कालावधीत काटकसर न करता भागवता यावी या उद्देशाने शासन आदेशावरुन कल्याण डोंबिवली पालिकेने कल्याण, डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा येत्या सोमवार आणि मंगळवारी 24 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पाणी कपातीच्या कालावधीत कल्याण डोंबिवलीकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. पाणी काटकसरीने वापरुन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस सहकार्य करावे असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. ग्रामीण भागात याचे सर्वाधिक परिणाम जाणवत आहे.