Judge Loya Case: 'न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची चौकशी SIT द्वारे करा', अंबादास दानवे यांची मागणी

ही चौकशी करण्यासाठीही एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे.

Judge Loya Case | (Photo courtesy: archived, edited, symbolic

न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया (Judge Brijgopal Loya Death Case) यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ही चौकशी करण्यासाठीही एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. दानवे यांच्या मागणीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडण्याची शक्यता आहे. दिशा सॅलियन आत्महत्या (Disha Salian Suicide Case) प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन केली जाणार आहे. ही एसआयटी या प्रकरणात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून वारंवार आरोप झालेल्या शिवसेना (UBT) आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दानवे नागपूर येथे बोलत होते.

न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत गूढ

न्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या गूढ मृत्यूबाबत राज्य आणि देशाच्या विविध वर्तुळात नेहमीच दबकी चर्चा सुरु असते. अनेकदा या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी होते. मात्र, ती फारशी लावून धरली जात नाही. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार असतानाही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होऊ शकते असे म्हटले होते.  (हेही वाचा, SIT in Disha Salian's Death Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी SIT स्थापन, राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश)

पत्रकार निरंजन टकले यांच्या पुस्तकामुळे खळबळ

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आरोपही केले जात होते. मात्र, असे असले तरी, न्या. लोया यांचे पूत्र अनुज लोया यांनी मात्र आम्हाला त्यांच्या मृत्यूबाबत कोणताही संशय नाही. त्यामुळे कोणत्याही चौकशीची आवश्यकता नाही, असे म्हणत चौकशीच्या मागणीला नकार दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांचे 'Who Killed Judge Loya' (हू किल्ड जज लोया) हे पुस्तक आले आणि खळबळ उडाली. हे पुस्तक सर्वत्र उपलब्ध असून मोठ्या खपाचे म्हणून ओळखले जाते. या पुस्तकात विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अनेक भाजप नेत्यांवर आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी याच पत्रकाराने 'द कॅरव्हान' या इंग्रजी मासिकाने नोव्हेंबर 2017 मध्ये या प्रकरणात पहिलं वृत्त प्रकाशित केले होते. ज्यामुळे सुरुवातीला मोठी खळबळ उडाली होती. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Death Case: गोपीनथ मुंडे, न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करा: शिवसेना)

 दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांमध्ये आरोप केले जात आहेत. याच प्रकरणात आता एसआयटीसुद्धा स्थापन करण्यात आली आहे. अशा वेळी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता या गटाकडून न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत चौकशीची मागणी पुढे लावून धरली जाण्याची शक्यता आहे.